‘महाविकास’चे चौथे उमेदवार संभाजीराजेच, संजय पवार निवडणूक लढविणार का? | पुढारी

‘महाविकास’चे चौथे उमेदवार संभाजीराजेच, संजय पवार निवडणूक लढविणार का?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत चार जागा लढविण्याचे ठरले आहे. चौथ्या जागेवर महाविकास आघाडीचे पुरस्कृत म्हणून संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. शिवसेनेने संजय पवार यांचे नाव चर्चेत आणून तात्पुरती राजकीय खेळी केल्याचीही चर्चा आहे.

संभाजीराजे यांना शिवसेनेने शिवबंधन बांधल्यावरच आम्ही उमेदवारी देऊ, असे सांगितले होते. त्यासाठी सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती. या मुदतीत संभाजीराजे यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्याचवेळी शिवसेनेकडून अचानकपणे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने शिवसेनेकडून संजय पवार यांचे नाव पुढे आणत ही तात्पुरती राजकीय खेळी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संजय पवार निवडणूक लढविणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.

22 जून 1989 रोजी शाहू महाराज यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर दि. 30 डिसेंबर 1997 रोजी शाहू महाराज, संभाजीराजे आणि मालोजीराजे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. 2009 साली संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. 2016 साली भाजपने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठविले. आता ते महाविकास आघाडीकडे ओढले गेले आहेत.
संजय पवार कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आहेत.

संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्याचे टाळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ वर्तुळातूनच संजय पवार यांचे नाव मुद्दामहून चर्चेत आणण्यात आले. यामागे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे तसेच ही तात्पुरती राजकीय खेळी आहे, असे मानले जाते. ही चर्चा सुरू करण्यामागे शरद पवार, संजय राऊत हेच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे प्रत्येकी एक उमेदवार त्यांच्या संख्याबळानुसार निवडून येतात. उर्वरित मतांमधून चौथी जागा लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. या सगळ्या घडामोडींतून संभाजीराजे यांना शिवसेनापुरस्कृत उमेदवार म्हणून किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे. त्या द़ृष्टीने मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मुंबईत दाखल झाले आहेत.

Back to top button