दाऊदच्या भाच्याची कबुली नवाब मलिक यांना नडणार | पुढारी

दाऊदच्या भाच्याची कबुली नवाब मलिक यांना नडणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर याने दुबईला पसार होण्यापूर्वी ईडीला दिलेल्या जबाबाने ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. हसीना पारकर हिने आपल्या ताब्यात असलेली कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जागा मलिकांना विकल्याचे त्याने ईडीला दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

ईडीने याच गोवावाला कंपाऊंडच्या व्यवहाराप्रकरणी मलिक यांना अटक केली असून ईडीला मलिकांविरोधात एक चांगला पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.

दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात गुन्हा दाखल करून छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने अलिशाह याची चौकशी केली होती. ईडीला दिलेल्या जबाबात अलिशाह याने काही खुलासे केले आहेत. तो म्हणतो, माझी दिवंगत आई हसीना पारकर उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला साधारणपणे 3 ते 5 लाख रुपये भाडे मिळत होते. माझी आई रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची.

ती मालमत्तेशी संबंधित वादही मिटवत होती. मामा दाऊद इब्राहिम आणि आई हसीना पारकर यांच्यातले संबंध चांगले होते. ते एकमेकांशी फोनवरून बोलत होते. माझी आई तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करत होती. मात्र याबाबत माझ्याकडे फारसा तपशील नाही.

माझी आई हसीना पारकर ही मामा दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती. माझी आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या. आईच्या निधनानंतर माझा मामा इक्बाल कासकर यांनी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि त्यांची देखभाल सुरू केली.

हसीना पारकरचे सलीम पटेल आणि खालीद हे दोन प्रमुख सहकारी होते, तर शमीन म्हणून आणखी एक जण माझ्या आईसाठी काम करत होता. सलीम पटेल हा कांद्याची खरेदी-विक्री करत होता आणि मालमत्तेच्या व्यवहारातही होता. हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील बिल्डिंगचा वाद मिटवला होता. पुढे तेथे एक ऑफिस सुरू करण्यात आले आणि गोवावाला कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेला होता.

माझ्या आईच्या वतीने सलीम पटेल त्या ऑफिसमध्ये बसून कामकाज पाहात होता. त्यानंतर हसीना पारकर हिने तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिक यांना विकला, असे अलिशाह याने ईडीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केल्याची माहिती मिळते. दरम्यान, ईडीकडे जबाब नोंदविल्यानंतर अलिशाह पसार झाला असून तो कुटुंबासोबत दुबईमध्ये स्थायिक झाला आहे. तो भारतात न परतल्यास ईडीची अडचण होण्याचीही शक्यता आहे.

Back to top button