स्वारगेट मेट्रो स्थानक तीन महिन्यांत पुर्ण : स्थानकाचे पाच मजले जमिनीखाली | पुढारी

स्वारगेट मेट्रो स्थानक तीन महिन्यांत पुर्ण : स्थानकाचे पाच मजले जमिनीखाली

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. स्वारगेटचे स्थानक हे जमिनीच्या खाली पाच मजले आहे. स्थानकावरील इमारत बांधण्यास आणखी एक-दीड वर्षाचा कालावधी लागेल. मेट्रोचा भुयारी मार्ग येत्या महिन्याभरात पूर्ण होत असून, वर्षभरात स्वारगेटहून मेट्रो थेट पिंपरीपर्यंत धावू लागेल. जमिनीखाली पाच मजले गेल्यानंतर, तेथे दहा मीटर म्हणजे तीस फूट उंचीचे भुयारी स्थानक बांधण्यात येत आहे. स्वारगेटहून मंडईच्या दिशेने भुयारी मार्ग खणण्यास गेल्या वर्षी प्रारंभ झाला होता. मेट्रो रेल्वेची ये-जा करण्यासाठीचे स्वारगेट येथील दोन्ही भुयारी मार्ग झालेले आहेत.

मंडई ते बुधवार पेठ दरम्यानचा दुसरा भुयारी मार्ग येत्या पंधवरड्यात झाल्यानंतर, दोन्ही भुयारी मार्ग पूर्ण होतील. सध्याच्या पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गावरील स्वारगेट शेवटचे स्थानक असल्याने, स्वारगेटच्या पुढे कात्रजच्या दिशेनेही काही अंतरापर्यंत भुयारी मार्ग खणण्यात आला आहे. स्थानकावर दोन्ही बाजूने मेट्रो मार्ग असून, मध्यभागी प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म बांधण्याचे सुमारे 80 टक्के काम झाले आहे. येत्या तीन महिन्यांत ते पूर्ण होईल. त्याच्यावरील बाजूला मेझानाईन आणि कॉनकोर्स मजले उभारण्यास प्रारंभ झाला आहे.

तळमजल्यावरील मेझानाईन मजल्यावर मेट्रोच्या कामाशी संबंधित यंत्रसामग्री ठेवण्यात येईल. त्यावरील कॉनकोर्स मजल्यावर प्रवाशांना मेट्रोचे तिकीट मिळू शकेल, तेथून प्रवाशांना ये-जा करता येईल. या दोन्ही मजल्यांसाठीचे स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रो स्थानकापासून वर जमिनीच्या दिशेने आल्यानंतर, तेथून भुयारी पादचारी मार्गाने प्रवाशांना स्वारगेट एसटी स्थानक, तसेच गणेश कला क्रीडा मंच येथे जाता येईल. त्याचबरोबर पीएमपी, रिक्षा आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवाही तेथे मिळू शकेल.

स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब

मेट्रो रेल्वेसोबतच तेथे स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब बांधण्यात येणार आहे. जमिनीखाली सहा मजले वाहनतळ बांधण्यास सुरवात झाली आहे. सुमारे दीडशे मीटर लांबीच्या व पन्नास मीटर रुंदीच्या या वाहनतळाचे दोन मजल्याचे स्लॅब टाकण्यात आले आहेत. या सहा मजली वाहनतळावर कार, कॅब, दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ही इमारत जमिनीच्या पातळीवर पोहोचल्यानंतर, त्यावर पीएमपी, रिक्षा आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वाहनांसाठी सोय उपलब्ध करून दिली जाईल. स्वारगेट एसटी स्थानक, मेट्रो स्थानक येथे जाण्यासाठी भुयारी पादचारी मार्ग बांधण्यास सुरवात झाली आहे. वाहनतळ आणि मेट्रो स्थानक या ठिकाणी तळमजला सार्वजनिक वाहतुकीसाठी दिल्यानंतर पुन्हा सहा मजले उंचीचे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. ते काम दुसर्‍या टप्प्यात केले जाईल. पाठीमागील बाजूला 25 मजली म्हणजे सुमारे शंभर मीटर उंचीची भव्य इमारत पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येईल.

असे असेल ट्रान्सपोर्ट हब

  • जमिनीखाली 5 लेव्हल्स
  • पीपीपी तत्त्वावरील इमारत 25 मजले
  • मेट्रो स्थानकाची लांबी 180 मी.
  • मेट्रो स्थानकाची रुंदी 24 मी.

हेही वाचा

 

Back to top button