सातारा : वन्यजीव गणनेत 308 जनावरांची नोंद | पुढारी

सातारा : वन्यजीव गणनेत 308 जनावरांची नोंद

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वन्यजीव गणनेत बिबट्यासह 308 जनावरांची नोंद झाली आहे. व्याघ्र प्रकल्पात केवळ एकच बिबट्या आढळला आहे. कोरोनामुळे गतवर्षी प्राणीगणना झाली नव्हती. यंदा कॅमेरा ट्रैपिंग आणि अन्य तंत्रज्ञानाने वन्यजीव गणना झाली. व्याघ्र प्रकल्पात उदमांजरासह राज्य प्राणी शेकरू, मोर, अस्वल यांच्या अस्तित्वाची नोंद झाली आहे.

व्याघ्र प्रकल्पातील ढेबेवाडी, हेळवाक, चांदोली, कोयना, बामणोली या पाच वनपरिक्षेत्रात एकूण 54 मचानांवर निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पाणवठ्यावरील वन्यप्राणी गणना पार पडली. या वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह 15 वन्यप्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले. प्रगणकांकडून भरून घेण्यात आलेल्या वन्य प्राणी गणनेत आढळलेले प्राणी- बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्वल, वानर, सायाळ, मुंगूस, मोर, रानकोंबडी, शेकरू, उदमांजर असे 308 वन्यजीव आढळून आले.

या वन्यजीव गणनेत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 25 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निसर्ग अनुभव उपक्रम राबविण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार, संदीप जोपाळे, नंदकुमार नलावडे, शिशुपाल पवार, बाळकृष्ण हसबनीस यांनी ही गणना केली.

या गणनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यामधून काही ठरावीक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. निवड झालेल्या स्वयंसेवकांना निसर्ग अनुभव कार्यक्रमअंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावरील वन्य प्राणी प्रत्यक्षात पाहून गणना करता आली.

प्रत्येक मचानावर तिघांची नियुक्ती

50 मशिन्सच्या सहाय्याने ही गणना करण्यात आली. उन्हाळ्यामध्ये जंगलातील बहुतांश पाणवठे कोरडे असतात. काही ठरावीक ठिकाणी पाणीसाठा असल्याने वन्यप्राणी अशा पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा पाणवठ्यावर लाकडी मचान बांधले होते. प्रत्येक मचानावर दोन स्वयंसेवक व एक वन कर्मचारी अशी तिघांची नियुक्ती केली होती.

Back to top button