एमबीए प्रवेशासाठी चुरस वाढणार : एक लाख 60 हजारांवर विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी | पुढारी

एमबीए प्रवेशासाठी चुरस वाढणार : एक लाख 60 हजारांवर विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी

 गणेश खळदकर

पुणे : मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन अर्थात एमबीए या अभ्यासक्रमासाठी साधारण 40 हजार जागा उपलब्ध आहेत, परंतु एमबीए प्रवेशाच्या सीईटीसाठी यंदा तब्बल 1 लाख 60 हजार 781 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काही वर्षांपूर्वी पदवीधर विद्यार्थी व्यवसायातील व्यवस्थापन शिकण्यासाठी एचआर, मार्केटिंग, फायनान्स, प्रॉडक्शन आदी शाखांमधून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करत असत आणि संबंधित क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करत असत. परंतु यामध्ये आमूलाग्र बदल झाला असून सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान,शेती, औद्योगिक कंपन्या, डिजीटल प्लॅटफॉर्मशी संबंधित कंपन्या किंवा व्यवसायामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सध्या एमबीएमधील पारंपरिक अभ्यासक्रमांबोरबरच एमबीए सर्व्हिसेस मॅनेजमेंट, एमबीए सस्टनेबल मॅनेजमेंट, एमबीए डिजीटल मार्केटिंग, एमबीए फिनटेक, एमबीए प्रोजेक्ट मॅनेजमेंट, एमबीए इन टेक्नॉलॉजी, एमबीए इन अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, एमबीए इन एनर्जी, हॉस्पिटल अ‍ॅण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट, एमबीए इन सप्लाय चैन मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट डेटा सायन्स, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश झाला आहे. वेगवगेळ्या कंपन्या सध्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. त्यासाठी डिजीटल मार्केटिंग हा अभ्यासक्रम आहे.

तसेच काही कंपन्या ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात काम करत आहेत. पेटीएम, फोन पे, गुगल पे यासारख्या विविध कंपन्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी फायनान्स आणि टेक्नोलॉजी यांच्या एकत्रिकरणातून निर्माण झालेला फिनटेक मॅनेजमेंट अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. सध्या मोठेमोठे प्रकल्प सुरू आहेत. उदा. वेगवेगळे नॅशनल हायवे किंवा मेट्रोसारखा प्रकल्प याचे व्यवस्थापन करण्यासाठी एमबीए प्रोजेक्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम आहे.

सध्या वेगवेगळ्या सेवा क्षेत्रांची वेगाने वाढ होत आहे. त्यासाठी एमबीए सर्व्हिसेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम आहे. तर अनेक कंपन्यांना शाश्वत विकासासाठी मनुष्यबळ गरजेचे असते. त्यासाठी एमबीए सस्टेनेबल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे परंपरागत अभ्यासक्रमाबरोबच विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रातील व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याची कला अवगत करण्याची संधी आपसुकच मिळत आहे.

एमबीए प्रवेश प्रक्रिया : 2021-22

विद्यार्थी नोंदणी 1 लाख 32 हजार 36
प्रवेशित विद्यार्थी 36 हजार 142

वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सध्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना मागणी वाढली आहे. त्यांना 9 लाखांहून अधिक रकमेचे वार्षिक पॅकेज मिळत आहे, परंतु जागा कमी आहेत, त्यामुळे सरकारने एमबीएसाठी जागा वाढविणे गरजेचे आहे.

                     – रमण प्रीत, संस्थापक-अध्यक्ष, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

सीईटीसाठी अर्ज करण्यास यंदा तीनदा मुदतवाढ देण्यात आली. त्याचबरोबर समाजमाध्यमांच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की एमबीएसह सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे

        – रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल

Back to top button