मुलुंडमध्ये शाळेच्या पाच वर्षीय चिमुरडीवर शिपायाचा अत्याचार | पुढारी

मुलुंडमध्ये शाळेच्या पाच वर्षीय चिमुरडीवर शिपायाचा अत्याचार

भांडुप/मुंबई ; पुढारी वार्ताहर : शाळेच्या पटांगणात खेळण्यास आलेल्या एका साडे पाच वर्षीय चिमुरडीवर शाळेच्याच 51 वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुलुंड पूर्व येथे घडली. हेमंत दामोदर वैती नावाच्या या नराधमास नवघर पोलिसांनी गजाआड केले आहे.

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने या शाळेचे पटांगण तसे सुनेसुने असते. शाळेत देखील हा नराधम शिपाई आणि इतर एक दोन कर्मचारी वगळता कोणी नसते. शाळेच्या आजूबाजूला रहाणारी लहान मुले शाळेच्या पटांगणात खेळण्यास येत असतात. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास शाळेच्या मैदानात बाजूलाच राहणारी ही पीडित मुलगी एकटीच खेळत होती.

या नराधम शिपायाची नजर तिच्यावर पडली. त्याने चॉकलेटचे अमिष दाखवून या मुलीला तो शाळेच्या एका खोलीत घेवून गेला आणि तिच्यावर लैंगीक अत्याचार करून तो निघून गेला.पीडित मुलीने सारा प्रकार घरी जाऊन पालकांना सांगताच त्यांनी तात्काळ नवघर पोलीस ठाणे गाठले.

मुलीने केलेले आरोपीचे वर्णन आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या शाळेत गेली 30 वर्षे शिपाई म्हणून काम करणार्‍या हेमंतला ताब्यात घेताच त्याने तात्काळ गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पीडित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button