Pune Crime : अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खैर नाही ! - पुढारी

Pune Crime : अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खैर नाही !

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अवैध धंद्याच्या (Pune Crime) बाबतीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता चांगलेच आक्रमक झाले आहे. अवैध धद्यांना अभय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे अल्टिमेटमच दिला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे, जुगार, दारु अड्डे आढळून आल्यास त्याला सर्वस्वी संबंधीत पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. एवढेच नाही तर आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे धंदे सुरू नाहीत असे लेखी प्रमाणपत्र त्याना सहायक आयुक्तांच्या मार्फत दोन दिवसांत सादर करावे लागणार आहे.

याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त मुख्यालय स्वप्ना गोरे यांनी पोलिस आयुक्तांच्या सुचनेनुसार काढले आहे. दोन दिवसांत या प्रमाणपत्राची पुर्तता पोलिस निरीक्षकांना करावी लागणार आहे.  शहरातील सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागातील पोलिस निरीक्षकांचा समावेश असणार आहे.

शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष मोहिम हाती घेतली. त्यानुसार त्यांनी नामचिन टोळीचे दादा, सराईत गुन्हेगारांवर जरब देखील बसवली आहे. मात्र, काही भुरट्या गुन्हेगारांचा उपद्रव शहरात सुरूच आहे. शहरातील मध्यवस्ती आणि उपनगर परिसरात अवैध धंद्याचा जोर वाढला आहे. त्यातूनच गटा-तटात संघर्ष निर्माण होऊ पाहतो आहे. अनेकदा अवैध धंद्यातून मिळणारी रसद ही गुन्हेगारीला खतपाणी घालते. त्यातूनच शहरातील गुन्हेगारी वाढताना दिसून येते आहे.गोळीबारासारखे गंभीर प्रकार देखील घडत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेत अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. रविवारी मध्यरात्री शिवणे रस्त्यावर एका टोळक्याने दुसऱ्या टोळक्यातील तरुणावर गोळीबार केला. हा गोळीबार पुर्ववैमनस्य आणि अवैध मटक्याच्या धंद्याच्या वादातून झाल्याची चर्चा आहे.

शहरातील काही पोलिस ठाण्याची हद्द पुणे ग्रामिणला (Pune Crime) लागून आहे. ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी अवैध धद्यांवाल्यांच्या नाड्या आवळल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बस्तान शहरालगतच्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बसविले आहे. त्यातूनच प्रतिस्पर्धी गटातून संघर्ष निर्माण होतो आहे. अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अधिकारी आणि वसुलीबहद्दर कर्मचाऱ्यांच्या मुक परवानगीने अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येते. अनेकदा गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली तरी पुन्हा काही दिवसानंतर त्यांचे उद्योग सुरू होतात. त्यामुळे आता थेट पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

पहा काय म्हटले आहे आदेशात…

संबंधीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे पुणे शहर यांना प्रमाणपत्राद्वारे लिहून द्यावे लागणार आहे की, त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी जुगार, दारू, मटका असे अवैध धंदे सुरू नाहीत. व आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहणार आहे. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईस व्यक्तिशः ते जबाबदार राहणार आहेत. तरी देखील कोणी चोरुन-लपून अवैध धंदे करीत असल्याची माहिती मिळून आल्यानंर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्फत हे प्रमाणपत्र अवघ्या दोनच दिवसांत त्यांना सादर करावे लागणार आहे.

पहा व्हिडीओ : आईचे तुकडे करणारा कसा पोहोचला फाशीच्या शिक्षेपर्यंत?

Back to top button