मार्केट यार्ड स्थलांतराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सूतोवाच | पुढारी

मार्केट यार्ड स्थलांतराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सूतोवाच

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘गुलटेकडी मार्केट यार्डात होणारी आवक तसेच वाढणारी गर्दी, यासाठी बाजार पुरेसा नसेल तर उद्याचा विचार करण्याची गरज आहे. वाढत्या शहराच्या पार्श्वभूमीवर मार्केट स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून लिहिलेल्या ‘व्यापाराचे विद्यापीठ’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी उद्योजक संजय घोडावत, बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गुलटेकडी मार्केट यार्डला विद्यापीठात रूपांतरित करण्यात मोलाचा वाटा असलेल्या मार्केट यार्डशी संबंधित विविध क्षेत्रांतील 31 मान्यवरांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मानित करण्यात आले. कॉन्व्होकेशन कॅप, सन्मानचिन्ह असे सन्मानाचेे स्वरूप होते.
पवार म्हणाले, ‘शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नाना-भवानी पेठ येथून गुलटेकडी मार्केट यार्ड येथे बाजार स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी या निर्णयाला मोठा विरोध झाला. परंतु, बाबा पोकर्णा यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित येऊन यावर तोडगा काढला. त्यानंतर खर्‍या अर्थाने व्यापार्‍यांची वृद्धी झाली. व्यापारीवर्गाने भविष्याचा विचार करून कष्ट करावे. ते करताना दर्जामध्ये तडजोड न करण्याची वृत्ती त्यामध्ये असावी.

ग्राहक हाच परमेश्वर असल्याची भूमिका अंत:करणात ठेवून त्या भावनेने काम करण्याची गरज आहे. व्यापारी, उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे खर्‍या अर्थाने देशाचा विकास झाला आहे. या वेळी पवार यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे किर्लोस्कर, अंबानी, अदाणी, जे. आर. डी. टाटा, बजाज आदी व्यावसायिकांसोबतचे अनुभव उपस्थितांना सांगितले. तर, व्यवसायाच्या क्षेत्रात स्वप्ने साकारण्याची धडपड करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यावसायिकांनी शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात करावी, असे आवाहनही पवार यांनी उपस्थितांना या वेळी केले. या वेळी संजय घोडावत, विद्याधर अनास्कर, विठ्ठल मणियार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व सन्मानितांच्या वतीने राजेश शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

‘मास्टर ऑफ बिझनेस’चे मानकरी

विद्याधर अनास्कर, विठ्ठलशेठ मणियार, डॉ. बाबा आढाव, अ‍ॅड. एस. के. जैन, सुनील पवार, अ‍ॅड. अभय छाजेड, राजेश शहा, विजय भंडारी, कृष्णकुमार गोयल, श्याम अगरवाल, बंकटलाल रुणवाल, विलास भुजबळ, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेश फुलफगर, मोहन ओसवाल, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा, अजित सेठिया, प्रवीण चोरबोले, राजेश सांकला, रायकुमार नहार, राजकुमार चोरडिया, प्रकाशशेठ पारख, राजेंद्र बोरा, हर्षकुमार बंब, बाळासाहेब कोयाळीकर, कन्हैयालाल गुजराथी, राजेंद्र चांडक, सतीश गुप्ता, दिलीपभाई मेहता यांना ’मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मानित करण्यात आले.

 

हेही वाचा :

 

 

 

Back to top button