नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅक्सिनेशन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गावोगावी कोरोना लसीकरण करण्यात आले. उपक्रमातून जिल्ह्यात लसीकरणाचा 1 लाख 3 हजार 226 चा टप्पा पूर्ण करण्यात आला.
कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या नोव्हेंबरमध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व स्वदेस फाउंडेशन यांच्यात संयुक्त विद्यमाने व्हॅक्सिनेशन ऑन व्हील उपक्रम राबविण्यात आला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आणि डॉ. कैलास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तालुक्यांतून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्वदेस फाउंडेशनने रुग्णवाहिका, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, चालक व रुग्णवाहिकेच्या इंधन खर्चाचा भार उचलला. जिल्हा प्रशासनाने कोविड-19 ची लस उपलब्ध करून दिली. लसीकरण उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. फाउंडेशनने 14 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. गेल्या गुरुवारी (दि.19) या उपक्रमाची सांगता झाली असून, त्याअंतर्गत 1 लाखांहून अधिकचा टप्पा पूर्ण केेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मिसाळ यांनी दिली.
रात्रीही झाले लसीकरण – व्हॅक्सिनेशन ऑन व्हील उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम पाडे, वस्ती तसेच गावामध्ये जाऊन नागरिकांचे तसेच रुग्ण, दिव्यांगाचे लसीकरण करण्यात आले. काही ठिकाणी रात्रीचे लसीकरण सत्र राबण्यात आले. स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला व झरिना स्क्रूवाला, सीईओ मंगेश वांगे, संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम पूर्ण करण्यात आला.
अन्य जिल्ह्यांतही लसीकरण – व्हॅक्सिनेशन ऑन व्हील उपक्रम सुरगाण्यात (16026), नांदगावी (12124), पेठ (11369), त्र्यंबकेश्वर (11287), बागलाण (10721), येवल्यात (9629), निफाड (9528), इगतपुरी (8852), मालेगाव (7618), चांदवड (6060) असे एकूण 1,03,226 लसीकरणाचा टप्पा गाठण्यात आला. याशिवाय स्वदेसकडून रायगडला 7 रुग्णालयांद्वारे 51,110 व कोल्हापूरमध्ये 3 रुग्णालयांच्या सहाय्याने 11,730 लसीकरण करण्यात आले.