

उमेश कुलकर्णी
दौंड : दौंड नगरपालिकेची निवडणूक या वेळी प्रस्थापितांना अवघड जाण्याची शक्यता आहे. निवडणूक ही पंचरंगी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पक्ष, नुकताच नव्याने दौंड शहरात स्थापन झालेला आप हा पक्षदेखील निवडणुकीत उतरणार आहे. दौंड नगरपालिकेचे राजकारण मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून एक-दोन घरांभोवती फिरत आहे. या वेळी वेगळे चित्र होण्याची शक्यता आहे. भाजप व नागरिक हित संरक्षण मंडळ हे गतवेळेप्रमाणे एकत्रितपणे लढणार का भाजप चिन्हावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गेल्या 40 वर्षांपासून नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून निवडून येणारे प्रेमसुख कटारिया यांची यामुळे मोठी अडचण होणार आहे . सध्या भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल व कटारिया एकत्र आहेत, चिन्हाच्या आग्रहामुळे त्यांचे विस्कटू शकते अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात एकी असली तरी आगामी निवडणुकांमध्ये ते युती करतात का वेगवेगळे लढतात याकडे लक्ष आहे. प्रेमसुख कटारिया यांना शह देण्याकरिता दौंड विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते नंदू पवार हेदेखील ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत, तर नव्याने आलेला आप पक्ष किती उमेदवार देतो, हे पाहणे गरजेचे आहे.
मागील आठ महिन्यांपासून दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व नागरिक संरक्षण मंडळ यांनी एकमेकांवर कुरघोड्याची एकही संधी सोडलेली नाही. विकासकामांबाबत दोघांनीही 'खो' घातले. शहरात कोणतेही विकासाचे ठोस काम झालेले नाही. केवळ कुरकुंभ मोरी हा एक या पक्षांपुढे विषय होता, परंतु मागील पंधरा दिवसांपासून तोदेखील मार्गी लागला आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये कोणकोणते पक्ष कोणकोणते विषय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.