हळदीच्या प्रसारासाठी सांगली होणार ‘यलो सिटी’ | पुढारी

हळदीच्या प्रसारासाठी सांगली होणार ‘यलो सिटी’

सांगली ; उद्धव पाटील : केशरी-पिवळा रंग व या रंगाची उच्चतम गुणवत्ता यामुळे सांगलीच्या हळदीने सांगलीचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेला शंभर-सव्वाशे वर्षांची जुनी परंपरा आहे. हळदीने सांगलीचे नाव जगभर केले आहे. हा वारसा जतन व्हावा, ही ओळख कायम राहावी यासाठी ‘पिंक सिटी’च्या धर्तीवर ‘यलो सांगली सिटी’ची संकल्पना पुढे आली आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही संकल्पना साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील माती, पाणी, ऊन, वारा, शेणखत आणि अनोखे वाण यामुळे जिल्ह्यातून उत्पादन होणार्‍या हळदीला लाजवाब रंग आहे. सांगलीच्या हळकुंडाच्या केशरी-पिवळ्या तोडीला अखंड जगात तोड नाही. त्यामुळेच सांगलीची हळदीची बाजारपेठ देशाच्या व जगाच्या नकाशावर मान उंच करून ताठ उभी आहे. हळदीच्या वायदे बाजाराची सुरुवात सांगलीतून झाली. एक काळ असा होता की, हळदीचे दर सांगलीच्या बाजारपेठेतून ठरायचे. सांगलीच्या हळदीची आणि बाजारपेठेची ही उच्च परंपरा हा लाभलेला वारसा जतन करणे व वाढवणे आवश्यक आहे.

सांगलीचे ब्रँडिंग ‘यलो सिटी’च्या माध्यमातून करायचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या असोसिएशनशी आणि आर्किटेक्ट यांच्याशी प्राथमिक चर्चाही केली आहे. ‘यलो सांगली सिटी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी क्रेडाई, आर्किटेक्ट यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. सांगली शहरात यापुढे कोणतीही इमारत बांधायची असेल तर ती पिवळ्या रंगात मॅट फिनिशिंगमध्ये रंगविली जावी, अशी विनंती केली आहे. क्रेडाई, आर्किटेक्ट यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

प्रारंभ महापालिकेच्या इमारतींपासून

महापालिकेची यापुढे बांधली जाणारी कोणतीही इमारत असो अथवा जुन्या इमारतींचे नूतनीकरण असो, ते पिवळ्या रंगातच होईल. कोणत्या इमारतींना कोणता रंग असावा याबाबत महापालिकेचे बायलॉज आहेत. त्याबाबत महापालिका आयुक्तांना अधिकार आहे. त्यानुसार यापुढे बांधण्यात येणारी प्रत्येक शासकीय इमारत पिवळ्या रंगातच रंगविली जाईल. नागरिकांनीही नवीन इमारत बांधताना या संकेताचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. बाहेरची व्यक्ती शहरात आल्यानंतर पिवळ्या रंगावरून सांगलीची ओळख द़ृढ होईल.

शहर सौंदर्यीकरण..

आयुक्त कापडणीस यांनी यापूर्वी सांगली महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यावेळी त्यांनी शहर सौंदर्यीकरणाचे बायलॉज (उपविधी) बनवले होते. मात्र अंमलबजावणी झाली नव्हती. कापडणीस हे सांगलीत आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी शहर सौंदर्यीकरणाचे ‘बायलॉज’ बाहेर काढले. त्यातून महापालिका क्षेत्रात सध्या 10 कोटी रुपयांची शहर सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. खासगी व्यक्ती, संस्था आणि महापालिका यांच्या माध्यमातून अनेक ‘ओपन स्पेस’ विकसित करण्याचे काम सुरू आहे. महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक गार्डन विकसित होत आहेत. शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.

तुंगचा आदर्श राज्याने गिरवला

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यातील अनेक गावांनी भारावून काम केले. गावं आणि गावकर्‍यांची मने स्वच्छ होत होती. सन 2000 मध्ये तुंग हे गाव राज्यातील पहिले ‘पिंक व्हिलेज’ ठरले. त्यानंतर राज्यातील हजारभर गावे ‘पिंक’ झाली. गावातील सर्व इमारती गुलाबी रंगात रंगून गेल्या. कवठेपिरानही ‘गुलाबी’ झाले. मात्र नंतर सर्वत्रच अभियान थंडावले. त्यातून नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित होते.

पिवळाच रंगच का?

सांगली जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात हळद, ऊस, द्राक्ष, हळद ही प्रमुख नगदी पिके आहेत. या पिकांपैकी सांगलीच्या हळदीला शंभर-सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. हळदीचा वायदे बाजार सांगलीतून सुरू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. येथील हळदीच्या पिवळ्या रंगाचा दर्जा अतिशय उच्च आहे. हळदीने सांगलीचे नाव जगाच्या नकाशावर चमकवले आहे. त्यामुळे हळदीचा पिवळा रंग यावरून सांगलीचे ‘यलो सिटी’ ब्रँडिंग करण्याचे निश्चित झाले आहे.

Back to top button