एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करताय थांबा; 520 पुणेकरांना सायबर चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा | पुढारी

एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करताय थांबा; 520 पुणेकरांना सायबर चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

अशोक मोराळे

पुणे : ‘एसएन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलतोय… तुमचे सिम कार्ड बंद न होण्यासाठी 10 रुपये फी भरावी लागेल, म्हणजे त्याची केवायसी अपडेट होईल. त्यासाठी तुम्ही एनीडेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या आणि मी सांगतो ती प्रोसेस करा…’ असे जर तुम्हाला कोणी फोन करून सांगत असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण, सायबर चोरटे अ‍ॅपद्वारे सेकंदात तुमच्या बँक खात्याचा ताबा घेऊन अवघ्या काही मिनिटांत ते रिकामे करू लागले आहेत. नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी सायबर चोरटे नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. नागरिकदेखील अलगद त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

सेवानिवृत्त शिक्षक, पोलिस, सुशिक्षित तरुण-तरुणीदेखील त्याला अपवाद नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सिम कार्ड, बँक खाते, फोन पे, पेटीएमची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एनीडेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अ‍ॅप डाऊनलोड करताच एक रुपया, दहा रुपये असे पैसे ऑनलाइन भरण्यास सायबर चोरटे सांगतात. नागरिक कोणत्याही बाबींची खात्री न करता, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे भरून टाकतात. मात्र, याचवेळी सायबर चोरट्यांकडून पैसे भरणार्‍या व्यक्तीच्या बँक खात्याचा ताबा घेतला जातो. जेव्हा व्यक्तीला आपल्या खात्यातून पैसे गेल्याचे समजते, तेव्हा तो समोरील व्यक्तीला फोन करून पैसे गेल्याचे सांगतो.

मात्र, सायबर चोरटे अतिशय चलाखीने तुम्ही परत एकदा अ‍ॅपमधील लिंकवर क्लिक करून आणखी दहा रुपये पाठवा म्हणजे गेलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगतात. पैसे परत मिळतील या भाबड्या आशेपोटी पुन्हा नागरिक अ‍ॅपमधील लिंकद्वारे पैसे पाठवतात. पुन्हा सायबर चोरटे खात्यातून मोठी रक्कम काढून घेतात. आपली फसवणूक झाली आहे, हे त्या व्यक्तीला कळते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शहरात अशा अ‍ॅपद्वारे फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येते. चालू वर्षातील अवघ्या चार महिन्यांत पेटीएम, फोन पे, मोबाईल सिम आर्ड, बँक केवायसी अपडेट करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 520 पुणेकरांना सायबर चोरट्यांनी लाखोंचा आर्थिक गंडा घातला आहे. यातील बहुतांश गुन्ह्यात हे तीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून खात्यातून पैसे काढून घेतले आहेत.

पाहा कसे काम करते एनीडेस्क अ‍ॅप

याबाबत सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पडवळ सांगतात, ‘हे तिन्ही अ‍ॅप मुळात स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप आहेत. चार व्यक्ती एकाचवेळी एक काम एकत्र करीत असतील, तर ते पाहण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र, सायबर चोरट्यांकडून नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे. सुरुवातीला चोरट्यांकडून विविध बहाण्याने नागरिकांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले जाते. प्लेस्टोअरवर ते सहज उपलब्ध आहे. अ‍ॅप डाऊनलोड करताच नागरिकांच्या मोबाईलवर एक 9 अंकी कोड येतो. तो सायबर चोरटे अ‍ॅपमध्ये टाकण्यास सांगतात.

कोड टाकताच अ‍ॅपकडून परवानगी मागितली जाते. ते डाऊनलोड करून घेतलेल्या व्यक्तीकडून परवानगी दिली जाते, तसे सायबर चोरटे व्यक्तीच्या मोबाईलचा ताबा घेतात. सायबर चोरट्यांकडून काही पाच, दहा रुपये अशी रक्कम पाठविण्यास सांगितले जाते. जेव्हा नागरिक पैसे पाठविण्याची ऑनलाइन प्रक्रिया करतात, त्याचवेळी ही सर्व प्रक्रिया सायबर चोरट्यांना त्यांच्या मोबाईलवर दिसते. नागरिकांना ओटीपी कोणाला सांगू नये, याची माहिती असते. मात्र, अशा अ‍ॅपद्वारे पैसे पाठवू नयेत, याची माहिती नसते. त्यामुळे येथेच गफलत होते. जसे नागरिक माहिती अ‍ॅपद्वारे शेअर करतात, तसे सायबर चोरटे बँक खात्याच्या गोपनीय माहितीचा वापर करून खात्यातून पैसे काढून घेतात.

 

एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार नागरिकांनी असे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करून घेऊ नये. कोणतीही बँक किंवा मोबाईल कंपनी असे अ‍ॅप डाऊनलोड करून केवायसी अपडेट करण्यास सांगत नाही. हे स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप असल्यामुळे तुम्ही तुमचा ओटीपी सांगितला नाही, तरी तो तुम्ही पैसे पाठविताना सायबर चोरट्यांना दिसतो तसेच तुमच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून तुमचे खाते रिकामे करतात.
डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा :

Back to top button