राज्यसभेचे सोपे गणित अवघड? | पुढारी

राज्यसभेचे सोपे गणित अवघड?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहाव्या जागेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय गणिते नव्याने मांडली जात असून, छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत दाखल झाल्यास हे गणित सहज सुटेल. मात्र, राजे अपक्ष उभे राहिल्यास हे गणित अवघड होऊन बसण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील पक्षीय बलाबलावर टाकलेली ही एक नजर.

विधानसभेत शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पहिल्या उमेदवाराला 42 मतांचा कोटा दिला, तर त्यांच्याकडे 13 मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे 44 आमदार असून त्यांच्या एका उमेदवाराला 42 मते देऊन त्यांची दोन मते उरतात, तर राष्ट्रवादीकडे 53 मते असून त्यांच्या एका उमेदवाराला 42 मते गेली तरी त्यांच्याकडे 11 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांकडे 26 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराला 26 मते मिळतील. त्यांना आणखी 16 मतांची गरज आहे. या 16 मतांची तजवीज करण्यासाठीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांची बैठक शुक्रवारी बोलावली होती.

13 अपक्ष कुणाचे किती?

विधानसभेत 13 अपक्ष आमदार असून छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या अपक्ष आमदारांपैकी पाच अपक्ष हे भाजप समर्थक आहेत. तसेच जन सुराज्य पक्ष 1 आणि राष्ट्रीय समाज पक्ष 1 असे छोट्या पक्षांचे दोन आमदार भाजपकडे आहेत. भाजप 106, अपक्ष 5 आणि छोटे पक्ष 2 असे 113 आमदार भाजपकडे आहेत.

13 अपक्ष आमदारांपैकी 8 अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे 14 आमदार यांचा दुसर्‍या जागेसाठी पाठिंबा मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. छोट्या पक्षांचे 14 मध्ये मनसेचा 1 आमदार भाजपला मदत करू शकतो. तर एमआयएमचे दोन आमदार कुठे झुकतात, हेही महत्त्वाचे आहे.

छोट्या पक्षांची ताकद

छोट्या पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, एम आय एम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य शक्ती पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 असे 16 छोट्या पक्षांचे आमदार आहेत, तर अपक्ष 13 आहेत.

Back to top button