पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात २७ महिने घालवल्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांची शुक्रवारी जामिनावर सुटका करण्यात आली. आझम खान सीतापूर कारागृहातून बाहेर येताच त्यांचे दोन्ही मुलांसह शिवपाल यादव आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. आझम खान माजी सपा आमदार अनुप गुप्ता यांच्या सीतापूर येथील घरी अल्पोपहारानंतर रामपूरला रवाना झाले. मात्र, तीन दिवसांनंतर ते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने येऊ शकतात.
सपा आमदार आझम खान (Azam Khan) सीतापूर तुरुंगातून बाहेर पडताच भलेही रामपूरला गेले असतील, पण तीन दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांचा सामना होणार आहेत. राज्यात विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असताना आझम खान तुरुंगातून बाहेर आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 मे पासून सुरू होणार असून ते 31 मे पर्यंत चालणार आहे. योगी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 26 मे रोजी सादर करणार आहे.
आझम खान (Azam Khan) 26 फेब्रुवारी 2020 रोजी तुरुंगात गेले तेव्हा ते ते रामपूरचे खासदार होते. लोकसभेचे सदस्य म्हणून ते संसदेच्या अधिवेशनात भाग घेत असत. 2022 च्या निवडणुकीत रामपूर मतदारसंघातून 10व्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आझम खान यांनी लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला होता, परंतु अद्याप ते आमदार म्हणून शपथ घेऊ शकले नाहीत. अशा स्थितीत जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तीन दिवसांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे, त्यात ते सहभागी होऊ शकतात.
15 वर्षांनंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आली आणि योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. डिसेंबर 2017 मध्ये, यूपी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आझम खान विधानसभेच्या इमारतीबाहेर एकमेकांचे हात धरताना दिसले. योगी आणि आझम एकमेकांचा हात धरून काही अंतरावर जाताना दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आहे.
मुख्यमंत्री योगी आणि आझम खान विधानसभेच्या बाहेर हातात-हात घेऊन भलेही बोलत असतील, पण सभागृहात जाताच दोघेही आपापल्या भूमिकेत आले होते. मात्र, हे चित्र समोर आल्यानंतर काही दिवसांतच योगी यांच्या सत्ताकाळात आझम खान आणि त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक 89 गुन्हे दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत आझम खान यांनी 26 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची पत्नी आणि मुलासह रामपूर न्यायालयात आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यांना 27 फेब्रुवारी रोजी सीतापूर कारागृहात हलवण्यात आले. यानंतर 19 मे पर्यंत तुरुंगातच होतेचे. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आज, शुक्रवारी ते बाहेर आले.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसांनी सुरू होत असताना आझम खान तुरुंगातून बाहेर आले आहेत. अशा स्थितीत आझम खान जेव्हा विधानसभेच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी जातील आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांचा सामना होईल तेव्हा काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहावे लागेल.