जळगाव : बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड ; एकास अटक | पुढारी

जळगाव : बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड ; एकास अटक

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकून, नोटा छापण्याचे प्रिंटर आणि काही बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील पहुर बसस्थानकावर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित उमेश चुडामन राजपूत (वय २२, रा हिंगणे बु. ता. जामनेर) यांस ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँन्टमध्ये दोनशे रुपये दराच्या तीन नोटा मिळून आल्या. त्यापैकी एक नोट संशयास्पद वाटल्याने त्यास विचारपूस केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने स्वत:चे घरी हिंगणे बु. येथे युट्यूबवर पाहून रंगीत प्रिंटर व मोबाईलच्या साहाय्याने २०० रुपयांच्या नकली नोटा तायर करुन मार्केटमध्ये दिल्याची माहीती दिली.

युट्यूबवर पाहून छापल्या नोटा
पोलिसांनी हिंगणे बु. या गावी जावून आरोपीची घरझडती घेतली असता, त्याच्या घरात प्रिंटर, २०० रुपये दराच्या ४६ बनावट नोटा व नोटा बनवण्यासाठी लागणारे कोरे कागद असे साहित्य मिळून आले आहे. याबाबत आरोपी विरुध्द पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने किती बनावट नोटा तयार केल्या. व कोणकोणत्या मार्केटमध्ये वापरल्या व त्यास कोणी मदत केली, या बाबतचा तपास पोलीस करत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, चाळीसगांवचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, हवालदार विनय सानप, पो.ना. ज्ञानेश्वर ढाकरे, पो.कॉ. ईश्वर देशमुख, पो.कॉ. गोपाल माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा :

Back to top button