

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा
उजनी धरण यंदा प्लसमध्ये असल्याने पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना कडक उन्हाळा असूनही शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. सध्या धरणात 4.82 टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने यंदा धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी धरणातून आवर्तन सोडण्यात येते. यंदा त्यात बदल करून एकच आवर्तन महिनाभर सुरू होते. त्यामुळे शेतकर्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. दरवर्षी दोन आवर्तने सोडताना पाण्याचा मोठा अपव्यय होतो. कालवा नादुरुस्त असल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे यंदा आवर्तनात बदल करण्यात आला.
धरणात सध्या एकूण 68.48 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यात 4.82 टीएमसी एवढा जिवंत साठा आहे. मागील वर्षी 20 मेला उजनी धरणातून चार गाळ मोर्यांतून तीन हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता. हे पाणी भीमा नदीत सोलापूर शहराची तहान भागविण्यासाठी व सिंचनासाठी सोडण्यात आले होते. मागील वर्षी आजच्या तारखेला धरण मायनसमध्ये होते. उणे 5.49 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर उपयुक्त साठा उणे 83.24 दलघमी होता.