पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर अशक्य : नंदकुमार वडनेरे | पुढारी

पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर अशक्य : नंदकुमार वडनेरे

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर अशक्य असून कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठची वस्ती इतरत्र वसविणे अशक्यप्राय आहे. या भागातील पूरबाधित नागरिकांना महापूरबाबत माहिती मिळण्यासाठी अत्याधुनिक रडार बसविणे आवश्यक असल्याचे राज्याचे जलसंपदा विभागाचे माजी सचिव नंदकुमार वडनेरे यांनी सांगली रोटरी क्लबमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबीनारमध्ये सांगितले.

वडनेरेे म्हणाले, पर्जन्यमापन यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. हवामानाचा आणि पावसाचा अंदाज येण्यासाठी नवीन रडार बसविणे गरजेचे आहे. परदेशात नव्या पद्धतीचे पर्जन्यमापक रडार बसविण्यात आले आहे. त्यानुसार येथील पूरबाधित नागरिकांना तेथे येणारा महापूर आणि पडणारा पाऊस याची माहिती मिळते. त्यानुसार ती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.

2021 मध्ये सन 2019 पेक्षा महाभयंकर पाऊस पडला. सन 2019 मध्ये 72 इंच इतका पाऊस पडला होता. तो यावर्षी 81 इंच इतका पडला आहे. धरण क्षेत्रात सन 2019 मध्ये 23 इंच तर यावर्षी 30 इंच इतका पाउस पडला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही गावात ढगफूटी सदृष्य पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि ढगफूटी झालेले पाणी एकत्रितरित्या नदीपात्रात आल्याने मोठ्या प्रमाणातून महापूर आला.

सन 2019 मध्ये आलेला महापूराचा धडा घेत महाराष्ट्र शासनाने यावर्षी कर्नाटक शासनाची पूर्व नियोजन केले होते. जलसंपदा मंत्री आणि सचिव स्तरावर महापूराबाबत बैठका घेण्यात आल्या होत्या. याबाबत कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूराबाबत योग्य नियोजन करण्यात आले होते. दोन्ही राज्यातील चर्चेनुसार अलमट्टी धरणातून होणारा 98 हजार क्युसेक्स विसर्गावरून तो 4 लाख प्रतिसेकंद विसर्गापर्यंत नेण्यात आला. त्यामुळे सन 2019 पेक्षा जादा पाऊस पडून देखील योग्य नियोजनामुळे महापूराचे योग्य नियोजन करता आले आहे.

नदीपात्रालगत केलेली अतिक्रमणे देखील महापूराला कारणीभूत ठरत आहेत. भिंत उभारून आणि नदीपात्राची खोली वाढवून महापूर रोखता येणे अशक्य आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमीत करणे गरजेचे आहे. महापूर आला की एनडीआरएफ सारखी यंत्रणा येते मदत करते आणि निघून जाते. परंतु भविष्यात याचा विचार करून एनडीआरएफच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे देखील गरजेचे आहे.

जागतीक तापमान वाढ देखील या महापूरास कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. तापमान वाढ झाल्याने ढगफूटी सारखी परिस्थिती निर्माण होत आहे. 90 किलोमीटर वेगाने पाऊस पडत आहे. त्यामुळे ढगफूटी होत आहे. महापूरास ढगफूटी देखील प्रमुख कारण आहे.

यावर्षी केवळ 5 दिवस महापूर

सन 2019 मध्ये आलेला महापूर 12 ते 15 दिवस होता. त्या वर्षी कोयनेतून 98 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले होते. परंतु यावर्षी कोयनेतून 14 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकाच्या पूर्व नियोजनामुळे पाणी अलमट्टीतून 4 लाख क्युसेक्सने पुढे वाहून गेल्याने सांगलीत केवळ 5 दिवस महापूर होता, असेही वडनेरे यांनी यावेळी सांगितले.

अलमट्टीतील विसर्गाने महापूर नियंत्रणात

सन 2019 च्या महापूराचा धडा घेवून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने योग्य समन्वय ठेवून अलमट्टी धरणातून 4 लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सन 2019 पेक्षा महाभयंकर पाऊस पडून देखील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर रोखण्यात महाराष्ट्र शासनाला यश आले असल्याचे वडनेरे यांनी सांगितले.

Back to top button