पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अर्धवटच | पुढारी

पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अर्धवटच

हिरा सरवदे
पुणे : पावसाळा पंधरा दिवसांवर आला तरीही महापालिकेच्या पावसाळी कामांनी वेग घेतलेला नाही. ही कामे आतापर्यंत निम्मीसुद्धा पूर्ण झालेली नसून, उण्यापुर्‍या पंधरा दिवसांत राहिलेली कामे कशी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. पावसाळ्यात नाले तुंबण्याचे, ओढे दुथडी भरून वस्तीत पाणी शिरण्याचे प्रकार होण्याची भीती आहे. पुण्यातील रस्त्यांच्या कामाच्या निविदासुद्धा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत.
त्यामुळे ती पावसाळ्याआधी पूर्ण होणे अवघड मानले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून पंधरा दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात आहे.
दरवर्षी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईन, चेंबर आदींची साफसफाई आणि राडारोडा उचलण्याची कामे केली जातात; तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जाते. ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, दरवर्षी ही कामे करण्यासाठी ठेकेदार कमी दराने निविदा भरतात, आणि त्या मंजूरही होतात. कामे झाल्यानंतर त्या कामाची बिले निघतात.
मात्र, पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते. यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय घेतला जातो. काम न करताच नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने बिले काढतात, अशी टीका दरवर्षी होते. महापालिका प्रशासनाने यंदाही पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, पावसाळा पंधरा दिवसांवर आला तरी पावसाळी कामे वेग घेत नसल्याचे चित्र आहे. ही कामे सुरू करून महिना उलटून गेला आहे. या कालावधीत 50 टक्केपेक्षा कमी कामे झाली आहेत. अद्याप निम्म्यापेक्षा अधिक कामे होणे बाकी आहेत.
आजवर ही कामे झाली…
  • 102493 मी (102 किमी) लांबीच्या पावसाळी लाईन आणि 22954 चेंबरची साफसफाई
  • पावसाळी लाईन साफसफाईचे काम 31.51 टक्के
  • चेंबर साफसफाईचे काम 41.51 टक्के
  • शहरातील नाल्यांमध्ये 76 धोकादायक ठिकाणे आहेत
  • 53 ठिकाणी उपाययोजना व दुरुस्ती करण्यात आली आहे
  • 97659 मीटर (97 किमी) लांबीची नालेसफाई पूर्ण
  • 373 कल्व्हर्टपैकी 221 ठिकाणी साफसफाई पूर्ण
वाहिन्यांची स्थिती काय आहे…
  •  शहरातील रस्त्यांवर अंदाजे 325262 मीटर (325 कि.मी.) लांबीच्या पावसाळी लाईन्स असून, त्यावर 55 हजार 300 पावसाळी चेंबर्स आहेत.
  • महापालिकेच्या हद्दीत एकूण 15 मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) असून, 2006 कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या आहेत. यामध्ये 60 टक्के मलवाहिन्या 12 इंच, 16 टक्के मलवाहिन्या 18 इंच व्यासाच्या आहेत. या मलवाहिन्यांवर 1 लाख 19 हजार 52 मॅनहोल आहेत.
रस्त्यांची कामे अडकली…
विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने विविध कंपन्यांना खोदाईसाठी सशुल्क परवानगी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होईपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे काम होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप रस्ते तयार करण्यासाठी निविदाच काढण्यात आलेल्या नाहीत. रस्त्यांसाठी 65 कोटींच्या खर्चाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून, लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात येत आहे.
दररोज होणार पाहणी..
पावसाळी कामे मेअखेर पूर्ण होणे धूसर असल्याने ही कामे निदान 15 जूनपर्यंत तरी पूर्ण व्हावीत, यासाठी महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार दररोज एक अतिरिक्त आयुक्त कामांची पाहणी करणार आहेत.
हेही वाचा :

Back to top button