धुळे : पुढारी वृत्तसेवा
देशातील वाढती महागाई हा मोठा चिंतेचा विषय असताना देशात जाती धर्माच्या विषयात लोकांना गुंतवून ठेवले जात आहे. केंद्र शासनाने तातडीने महागाईवर नियंत्रण करावे, अन्यथा समाजवादी पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आज देण्यात आला.
धुळ्यात वाढत्या महागाईच्या विरोधात आज समाजवादी पार्टीने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात जमील मंसुरी, अखिल अन्सारी, नगरसेवक अमीन पटेल, आसिफ इनायात, इनाम सिद्दिकी, जाकीर खान, डॉक्टर सर्फराज अन्सारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या समोर आपली भूमिका ठेवली. मागील काही वर्षांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य जनता, गरीब, कामगार, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्व वर्गाला सध्या महागाईचा फटका सहन करावा लागतो आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने शंभरी पार केली असून रेशन दुकानावर मिळणारे रॉकेल बंद झाले आहे. सध्या स्वयंपाकाचा गॅस हजाराच्या पार गेला असल्याने गरिबांना चूल पेटवण्यासाठी लाकडे मिळणे देखील अवघड झाले आहे. इंधनापासून ते खाद्यपदार्थ, गोडेतेल, दूध, भाजीपाला तसेच औषधोपचार आणि शैक्षणिक फी अशा सर्वच घटकांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ही फार मोठी चिंतेची बाब आहे. महागाईचा आलेख दिवसागणिक वाढतो आहे. दुसरीकडे बेरोजगारीची समस्या ही झपाट्याने वाढत आहे. केंद्रातील शासनकर्ते या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी सुडाचे राजकारण करीत आहेत. नवीन नवीन प्रश्न उकरून काढत जनतेची दिशाभूल केली जात आहे. याचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. देशात वाढती महागाई हा फार मोठा चिंतेचा विषय असताना जाती-धर्माच्या विषयात लोकांना गुंतवून ठेवले जाते आहे. या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.