सांगलीतील वस्तुसंग्रहालय प्रशस्त जागेच्या प्रतीक्षेत | पुढारी

सांगलीतील वस्तुसंग्रहालय प्रशस्त जागेच्या प्रतीक्षेत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रसिद्ध असणार्‍या वस्तू संग्रहालयामध्ये सांगलीच्या वस्तू संग्रहालयाचा नंबर लागतो. तैलरंग चित्रे, जलरंग चित्रे, पुतळे तसेच हस्तिदंत, चंदन आणि संगमरवरावरील कोरीवकाम, निरनिराळ्या धातूंचे ओतकाम व त्यावरील नक्षीकाम अशा विविध मौल्यवान व दुर्मीळ वस्तूंचा संग्रह या संग्रहालयामध्ये आहे. मात्र हे संग्रहालय प्रशस्त जागेच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबईतील व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांनी 1914 मध्ये इतिहास संशोधक पारसनीस, राजवाडे, खरे यांच्या सहाय्याने या संग्रहालयाची स्थापना केली. सांगली संस्थानचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी कलात्मक वस्तूंचा लोकांना आस्वाद घेता यावा, या उद्देशाने त्याचे रुपांतर राजवाड्याच्या इमारतीमध्ये संग्रहालयात केले. या संग्रहालयाचे उद्घाटन दि. 9 जानेवारी 1954 मध्ये भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थाने विलीन होण्याच्या काळात हे संग्र्रहालय मुंबईला नेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पटवर्धन सरकारांच्या आग्रहाखातर सांगलीतील नागरिकांसाठी हे संग्रहालय इथेत ठेवण्यात आले. सुरुवातीला हे संग्रहालय विलिंग्डन महाविद्यालयाच्या नियंत्रणाखाली होते. त्यानंतर दि. 30 जून 1976 पासून हेसंग्रहालय शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणात आहे.

या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी कलाकार जेम्स वेल्स यांची तैलरंगातील उत्कृष्ट चित्रे या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची जेम्स वेल्स यांनी रेखाटलेली मूळ चित्रे येथे आहेत. देशातील प्रसिद्ध चित्रकारांपैकी रा. धुरंधर, व्ही. व्ही. साठी, गांगुली यांची चित्रे देखील या संग्रहालयात पहावयास मिळतात. ए. एच. मुल्लर यांची रामायणातील प्रसंगावर आधारित 15 तैलरंगचित्रे हा या संग्रहालयाचा अनमोल ठेवा आहे. जपानमधील गौतम बुद्धाचे सुवर्णमंदिर तसेच सांगलीच्या आयर्विन पुलाची लाकडी प्रतिकृती येथे पहावयास मिळते.

विजयनगरच्या कृष्णदेवरायाच्या ताम्रपट आहे. चित्राप्रमाणे येथे शिल्पवैभवही अप्रतिम आहे. यामध्ये रोमन संस्कृतीतील मर्क्युरीचा पुतळा, इजिप्शिन पृथ्वीदेवता इसिस, न्यायदेवता असोरीक, गायक मुसे, तत्त्ववेता सॉक्रेटिक, रशियन राजा पिटर द ग्रेट, इजिप्तची राणी क्लिओपात्रा अशा महान व्यक्तींचे प्लास्टरच्या माध्यमातून आपली ओळख दाखवितात. तसेच तांब्या पितळेची कलात्मक भांडी, हस्तिदंती चटई, उठावाची काष्ठशिल्पे, चंदनाच्या पेट्या, लाकडी चौर्‍या, चंदनी पंखे, वेगवेगळ्या आकाराच्या व वैशिष्ट्यपूर्ण चिनीमातीच्या फुलदाण्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गेल्या 68 वषार्ंपासून सांगलीच्या वैभवात भर घालणार्‍या या संग्रहालयात कर्मचार्‍यांची कमतरता आहे. तसेच अपुर्‍या जागेमुळे अनेक अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत या संग्रहालयासाठी पाच एकर
जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, अद्यापही यावरती ठोस निर्णय झालेला नाही.

Back to top button