आता आरक्षणात अडकणार! माजी नगरसेवकांचे भवितव्य अद्यापही टांगणीला | पुढारी

आता आरक्षणात अडकणार! माजी नगरसेवकांचे भवितव्य अद्यापही टांगणीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना नक्की कोठून निवडणूक लढवायची, यासंबंधीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, पन्नास टक्के महिला आरक्षण आणि एससी व एसटीचे आरक्षण यासंबंधीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याने अनेक माजी नगरसेवकांचे भवितव्य अद्यापही टांगणीला लागले आहे. पुणे महापालिकेच्या 173 जागांच्या 58 प्रभागांची अंतिम रचना गत आठवड्यात जाहीर झाली. आता या प्रभागांमधील आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे.
पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार महापालिकेच्या 173 जागांपैकी 87 जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत, तर अनुसूचित जातीसाठी (एससी) 23 जागा आरक्षित होणार असून, त्यामध्ये एससी महिलांसाठी 12, तर उर्वरित 11 जागा एससी खुला प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे. याशिवाय अनुसूचित जमातीसाठी (एसटी) दोन जागा आरक्षित होणार असून, त्यामध्ये एक जागा महिला, तर एक जागा या प्रवर्गातील खुली असणार आहे. प्रामुख्याने एससी आणि एसटीचे आरक्षण प्रभागातील संबंधित प्रवर्गाच्या लोकसंख्येनुसार निश्चित केले जाते.
महिला आरक्षण मात्र सोडत पद्धतीनेच काढले जाते. ही आरक्षण सोडत निघाल्यानंतरच प्रभागातील खरे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, त्यानुसार प्रभागांमधील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ठरणार

प्रभागांमधील आरक्षण सोडतीवर अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामध्ये पुरुष आणि महिलांचाही समावेश आहे. जवळपास 29 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवार असणार आहेत. त्यामुळे ज्या प्रभागांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुक पुरुष असणार आहेत, त्यांची मोठी अडचण आहे. त्यामुळे 2017 ते 2022 या कालावधीत नगरसेवकपद भूषविलेल्या अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
उदा. महापालिकेच्या प्रभाग क्र. 1 मध्ये एक जागा एससी व एक जागा एसटी प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे. त्यामुळे उर्वरित एक जागा महिला आरक्षित असणार की खुल्या प्रवर्गासाठी, यावर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे व भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांचे भवितव्य ठरणार आहे. हीच परिस्थिती तब्बल 29 प्रभागांमध्ये असणार आहे.
हेही वाचा:

 

Rajiv Gandhi assassination case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारीवलनच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

गुजरातमध्ये आकाशातून कोसळले चिनी रॉकेट्सचे अवशेष

HBD Sonalee Kulkarni : हॉट कपलचं समुद्रकिनारी किसिंग फोटोशूट

Back to top button