भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार : शीतलकुमार रवंदळे | पुढारी

भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार : शीतलकुमार रवंदळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  नोकरीच्या संधी : तरुणांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाकडे लक्ष दिले पाहिजे. चांगल्या महाविद्यालयाची निवड केली, तर चांगला निर्णय घेऊन आपण करिअरची सुरुवात करू शकतो. निरनिराळ्या संस्थेत आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते.

महाविद्यालय निवडताना विचार करा. आज विद्यार्थी इंटर्नशिपच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करीत आहेत.

त्यामुळे येत्या काळात राेजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे आशादायी चित्र उलगडत डीन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे शीतलकुमार रवंदळे यांनी शनिवारी (दि. 7) विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

‘पुढारी’ एज्युदिशा या ऑनलाईन वेबिनारमध्ये शीतलकुमार रवंदळे हे ‘कोविडनंतरची प्लेसमेंट परिस्थिती’ या विषयावर बोलत होते.

प्लेसमेंटची सकारात्मक परिस्थिती, त्यात विद्यार्थ्यांना संधी आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

रवंदळे म्हणाले की, विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर कोरोनानंतर काय करायचे, हा ज्वलंत प्रश्‍न आहे.

प्रवेश कसा घ्यायचा. जे नोकरी करीत आहेत त्यांना भीती आहे, की आपली नोकरी टिकविण्यासाठी काय करायचे.

आपण आजच्या भारताच्या परिस्थितीकडे पाहिले, तर आपण घाबरून जायचे कोणतेही कारण नाही. खूप चांगली परिस्थिती आता निर्माण होत आहे.

प्लेसमेंटचे जर आपण पाहिले, तर गेल्या चार ते पाच महिन्यांत एवढी नव्हती तेवढी चांगली परिस्थिती आता उपलब्ध आहे.

आपली भारतीय अर्थव्यवस्था पाहिली, तर कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे साहजिकच थोडासा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारच होता.

परंतु, आयटी क्षेत्र मोठ्या संधी निर्माण करतो. इंजिनिअर्स, डिप्लोमाचे विद्यार्थी, एमबीए मॅनेजमेंटचे विद्यार्थी या सगळ्यांना आयटी क्षेत्राने अधिक संधी दिल्या आहेत.

या क्षेत्रातून प्रचंड प्रमाणात बूम आल्यामुळे चांगले वातावरण आताच्या नोकरदारांमध्येही आहे आणि ज्यांना पुढच्या खेपेत म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये प्लेसमेंट मिळणार आहे,

त्यांच्यासाठी अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले आहे. बर्‍याचशा आयटी कंपन्यांकडून आम्हाला मागणी येते की, आम्हाला अधिकाधिक विद्यार्थी उपलब्ध करून द्या.

भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे तीन भाग येतात. यात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रमाणात आपला फायदा करून घ्यायचा आहे.

लॉकडाऊनमधील रोजगाराच्या परिस्थितीबद्दल रवंदळे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे थोडीशी बेरोजगारी वाढली होती. तो दर एप्रिल 2020 मध्ये 24 टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

आता परिस्थिती सुधारली असून, 24 टक्क्यांवरून बेरोजगारीचा दर 6 टक्क्यांवर आला आहे. याचा अर्थ बर्‍याच लोकांना रोजगार उपलब्ध आहेत.

पण, भारतातील प्लेसमेंटची परिस्थिती पाहिली, तर 12 पैकी 8 लाख विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली आहे. हे प्रमाण 60 ते 65 टक्क्यांनी पुढे जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात खूप चांगल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी आहे.

सर्वांत जास्त नोकर्‍या मिळवून देणारे क्षेत्र म्हणजे इंजिनिअरिंग, डिप्लोमा, एमबीए. या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात नोकर्‍या दिसल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढाही इकडे वाढला आहे.

चांगले विद्यार्थी आपल्याला तयार करावे लागणार आहेत. आपण चांगले विद्यार्थी तयार केले, तर अतिशय चांगली परिस्थिती भारतीय तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे.

प्लेसमेंटचा विचार केला, तर आयटी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. वेगवेगळ्या देशांत शिक्षणाची आणि नोकरीची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Back to top button