क्षमता, आवड आणि करिअरची निवड

क्षमता, आवड आणि करिअरची निवड
Published on
Updated on

क्षमता, आवड व त्यानुसार करिअरची निवड याबाबतीत मुलांच्या मनात संभ्रम, गोंधळ कधी कधी गैरसमजही असतात. पालकांना करिअरच्या नवनवीन संधीबद्दल तुटपुंजी माहिती असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

आम्ही नेहमी सांगतो, की आपला 'आतला आवाज' ओळखा आणि त्याप्रमाणे करिअर निवडा. प्रीतमचं उदाहरण घ्या. उच्चशिक्षित आई-वडिलांची मुलगी प्रीतम. ती आमच्याकडे आली तेव्हा दहावी पास झाली होती.

तिनं डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आयएएस असं काहीतरी करावं, अशा आई-वडिलांच्या माफक अपेक्षा होत्या व त्यासाठी लागेल तो खर्च करण्याचीही त्यांची तयारी होती. पण प्रीतम यापैकी कशालाच होकार देत नव्हती. म्हणूनच तर ते आले होते. प्रीतमबरोबर मी थोड्या गप्पागोष्टी करते असं म्हणून तिला एकटीलाच कन्सल्टिंग रूममध्ये बोलाविले.

आपण साऊंडप्रूफ खोलीत आहोत, अगदी मोकळेपणानं बोल असं सांगितल्यावर प्रीतम घडाघडा बोलायला लागली. प्रीतमला लहानपणापासून स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता. स्वयंपाकाची इतकी आवड होती, की तिनं एका छान वहीत आजी-मावशीकडून त्यांना येणार्‍या रेसिपीज लिहून घेतल्या होत्या. टीव्हीवरील कुकरी शोज ती आवर्जून पहायची. सातवीत असल्यापासून तिला पूर्ण स्वयंपाक येतो आहे.

एवढंच नव्हे तर घरी पाहुणे आल्यानंतर 'आई, तू गप्पा मारीत बस, मी पाहते,' असं म्हणून भाजी मंडईत स्वतः जाऊन खरेदी करून आणून ती सहज स्वयंपाक तोही उत्तम आणि चवीष्ट, सर्वांना पुरेल इतका योग्य प्रमाणात करू शकत असे. घरी कुणी बायका आल्या तर ती तांदळाचे प्रकार, त्यांचा भाव, लोणची, पापड याविषयी गप्पा मारायची. त्या मध्यम वयाच्या बायका हिचं खूप कौतुक करायच्या. पण आई-वडिलांना हा सगळा अगदी 'बिलोे डिग्निटी' कारभार वाटायचा.

समस्या माझ्या लक्षात आली. एकतर आई-वडिलांच्या अपेक्षा, इच्छा पूर्ण करण्याची क्षमता प्रीतममध्ये नव्हती. ती या बुद्धिमत्तेच्या बाबतीत सामान्य होती. पण स्वयंपाक या क्षेत्रात खरोखरच असामान्य होती. तिला दुसरे काही करिअर करायला सांगणं हा तिच्यावर अन्यायच ठरला असता. आम्ही प्रीतमच्या आई-बाबांना समजावले. प्रीतमनं 'हॉटेल मॅनेजमेंट'ला प्रवेश घेतला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन एम.बी.ए. इन हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं.

आज ती फूड इंडस्ट्रीत एक उद्योजिका म्हणून ओळखली जाते. तिनं इतकं नाव कमावलं आहे, की आई-वडिलांना तिचा खूप अभिमान वाटतो, ज्यांना तिची ही आवडच 'बिली डिग्निटी' वाटत होती. तिचे टीव्हीवर अनेक कार्यक्रम होत असतात.

आणखी एक उदाहरण घेऊ –

स्वप्नाली नावाप्रमाणंच स्वप्नाळू आणि डॉक्टर दाम्पत्याची एकुलती एक लाडकी मुलगी. तिला दहावीला ऐंशी टक्के गुण होते. सायन्सला प्रवेश घेतला. तिनं डॉक्टरच व्हावं, अशी तिची आणि तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. बारावीला तिला जेमतेम 65 टक्के गुण होते. 'नीट'चा स्कोअरही चांगला नव्हता; पण आई-वडील तिच्यासाठी पेमेंट सीट घ्यायलाही तयार होते. पहा आवड होती; पण क्षमता कमी होती.

बुद्धिमत्तेनं ती सर्वसामान्य होती; पण कनवाळू होती. सर्व सायकॉलॉजिकल टेस्टचे रिपोर्टस व इतर गोष्टी अभ्यासून आम्ही निर्णय घेतला, की स्वप्नालीनं फिजिओथेरपीला अ‍ॅडमिशन घ्यावी.

एम.बी.बी.एस. नंतर च.ऊ. किंवा च.ड. त्यानंतर स्पेशलायझेशन हे सगळं तिला झेपणार नाही. ती पास होत जाईल, याचीही खात्री नाही. याऐवजी फिजिओथेरपीची बॅचलर डिग्री हेच एक स्पेशलायझेशन होते. शिवाय आवश्यक वाटल्यास ती त्यातही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकते. शक्य नसल्यास 'हॉस्पिटल मॅनेजमेंट'मध्ये डिग्री घेऊ शकते. स्वप्नालीला हे पटलं, कारण ती खूप अभ्यासू वगैरे नव्हतीच. आता चार वर्षांत ती डॉक्टर होणार होती. काही स्वतःचा उद्योग सुरू करू शकणार होती. थोडेसे कष्ट घ्यावे लागले.

'स्टडी स्किल्स'चं ट्रेनिंग द्यावं लागलं; पण स्वप्नाली एकदाही नापास न होता फिजिओथेरपीस्ट झाली. एका नामवंत ऑर्थोपेडिक सर्जनशी तिचं लग्नही झालं आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून ती आपली मेडिकल प्रॅक्टिस करते आहे. पहा क्षमता आणि आवड यानुसार करिअरची निवड हे मूलसूत्र इथेही लागू पडते.

16ते 18 या कोवळ्या वयात मुलांच्या मनात क्षमता, आवड व त्यानुसार करिअरची निवड याबाबतीत संभ्रम, गोंधळ कधी कधी गैरसमजही असतात. पालकांना करिअरच्या नवनवीन संधीबद्दल तुटपुंजी माहिती असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून योग्य करिअर निवडून त्याचा उपभोग घेण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा शोध क्षमता, आवड याबद्दल बोध होण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या अत्यंत उपयुक्त ठरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सायकॉलॉजीकल टेस्टस व समुपदेशन ऑनलाईन करणेही शक्य आहे व सहज करता येते. हे कोरोना, लॉकडाऊनच्या काळात आवर्जून नमूद करावेसे वाटते.

डॉ. रमा मराठे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news