राज्यातील आदर्श प्रकल्पाच्या शाळांत बांधणार नव्या वर्गखोल्या | पुढारी

राज्यातील आदर्श प्रकल्पाच्या शाळांत बांधणार नव्या वर्गखोल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा 
राज्यातील आदर्श शाळानिर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 488 शाळांपैकी 328 शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. ‘राज्य शासनाने 75.24 कोटी रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून दिला आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमांव्दारे दिली आहे.  राज्यातील शासकीय शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आदर्श शाळांची निर्मिती केली जात आहे.
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 488 शासकीय शाळा ’आदर्श शाळा’ म्हणून विकसित केल्या जात आहेत. त्यातील 328 शाळांमध्ये आता नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या 267 शाळा, तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या 61 शाळांमध्ये बांधकाम केले जाणार आहे. या शाळांच्या मोठ्या बांधकामांसाठी एकूण अर्थसंकल्पित तरतुदीच्या 30 टक्के निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कामाला चालना देण्यासाठी शिक्षण विभागाने हा निधी पहिला हप्ता म्हणून दिला आहे.
निधी खर्च करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. बांधकामावरील खर्चाचा वेळोवेळी आढावा शिक्षण आयुक्तांनी घ्यावा, असेदेखील कळविण्यात आले आहे.  यापूर्वी याच प्रकल्पांतर्गत 355 शाळांमध्ये दुरुस्ती, लहान बांधकामासाठी 53.97 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावे, प्रत्येक वर्गात शिक्षणासाठी उत्तम पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
हेही वाचा

Back to top button