गायीच्या दूध दर कपातीने शेतकऱ्यांची वाढत आहे अडचण! | पुढारी

गायीच्या दूध दर कपातीने शेतकऱ्यांची वाढत आहे अडचण!

पुणे : पुढारी वृत्तसेवा
जागतिक बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर खाली आल्याचे कारण पुढे करीत राज्यातील पावडर उत्पादकांनी गायीच्या दूध खरेदी दरात लिटरला एकदम तीन रुपयांनी कपात केली आहे.  प्रतिलिटरचा दर 36 वरून 33 रुपयांपर्यंत खाली आल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
खरेदीचे दर अचानक कमी केल्यामुळे खासगी पावडर उत्पादकांची मनमानी स्पष्ट झाली असून राज्य सरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नसल्याने शेतकरी वार्‍यावर असे चित्र निर्माण झाले आहे. भारतातून प्रामुख्याने आखाती देश, बांग्लादेश, श्रीलंका आदी देशांना दूध पावडर आणि बटरची निर्यात सुरू होती. मात्र, न्यूझीलंडसह अन्य देशांतील पावडरची आवक वाढल्याने आणि तुलनेने मागणी कमी राहिल्याने पावडर व बटरच्या दरात 12 ते 15 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
शिवाय जागतिक बाजारातही मागणी घटल्याचे कारण पुढे करीत दूध खरेदी दर एकत्रिपणे कमी करण्याचा धडाका पावडर उत्पादकांनी लावल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गायीच्या दुधाचा खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिसाठी 36 रुपयांवरून 33 रुपये झाला आहे. तर सहकारी डेअरीकडील खरेदी दर अद्यापही 35 रुपयांवर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पंधरवड्यात  दूध पावडरचा दर प्रतिकिलोस 320 वरून 270 रुपये, तर बटरचा दर किलोस 400 वरून 365 ते 370 रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात दर घटल्याने स्थानिक बाजारातही परिणाम होऊन दर घसरले. तसेच, तेलंगण, कर्नाटकमध्येही
दुधाची आवक वाढल्याने  तेथून महाराष्ट्रातील दुधास असणारी मागणी कमी झाल्यामुळे दूध खरेदी दर कमी करावे लागले आहेत.
                                                                                                           – मनोज तुपे, चेअरमन, 
                                                                                                     रिअल डेअरी

Back to top button