पिंपरी शहरात 20 दिवसांत 18 डेंग्यू बाधित रुग्ण

पिंपरी शहरात 20 दिवसांत 18 डेंग्यू बाधित रुग्ण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गेल्या 20 दिवसांत एकूण 18 डेंग्यू बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, तब्बल 1011 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूबाबत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात आली आहे.
शहरात पावसामुळे डासोत्पत्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाकडून विविध आस्थापनांची तपासणी करून डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, संबंधितांना नोटिसा बजावून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.

महापालिका वैद्यकीय विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून 20 जुलैपर्यंत एकूण 2 हजार 113 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जानेवारी ते जून अशा 6 महिन्यांमध्ये त्यातील एकही रुग्ण डेंग्यूने बाधित आढळला नव्हता. दरम्यान, 1 ते 20 जुलै या कालावधीत 1011 डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले. तर त्यातील 18 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुलैमध्ये हिवतापाचा रुग्ण नाही

जुलै महिन्यामध्ये हिवतापाचा (मलेरिया) एकही बाधित रुग्ण आढळला नाही. तथापि, जानेवारी ते जून अशा 6 महिन्यांमध्ये 9 बाधित रुग्ण आढळून आले. 1 जानेवारी ते 20 जुलै या दरम्यान चिकुनगुनियाचे 7 संशयित रुग्ण आढळून आले. तथापि त्यातील एकही रुग्ण बाधित झालेला नाही.

मे महिन्यात 100, जूनमध्ये 472 तर जुलैमध्ये 1011 डेंग्यू संशयित रुग्णांचे वायसीएम रुग्णालयातील सेन्टेनल सेंटरमध्ये सॅम्पल तपासण्यात आले. त्यामध्ये जुलै महिन्यात 1 ते 20 तारखेदरम्यान 18 रुग्ण बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यू बाधित रुग्णांसाठी आवश्यक सुविधा दिली जात आहे.

– डॉ. लक्ष्मण गोफणे,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news