पुण्यात चौकशीसाठी गेलेल्या सदावर्ते दाम्पत्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध | पुढारी

पुण्यात चौकशीसाठी गेलेल्या सदावर्ते दाम्पत्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात उच्च न्यायालयाने आदेशात दिलेल्या अटींचे पालन करत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे आपल्या पत्नीसोबत चौकशीसोठी आले असताना त्यांचा मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला.

बुधवारप्रमाणे ते गुरूवारीही चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सकाळी आले असताना हा प्रकार घडला. मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात अ‍ॅड. सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर, सातारा पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. याच दरम्यान पुण्यात सदावर्तेंवर दाखल असलेला गुन्हा समोर आला होता. मात्र, गुन्ह्यात अटक होण्यापूर्वीच सदावर्ते यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला होता.

सातारा व कोल्हापूर येथील राजे असलेल्या खासदारांविषयी आक्षेपार्ह वकत्व्य केल्याच्या आरोपावरून अ‍ॅड. सदावर्ते यांच्या विरूध्द पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात अटक होण्यापूर्वीच सदावर्ते यांनी जामीन मिळवल्याने त्यांची या गुन्ह्यातील अटक टळली. त्यांची बुधवारप्रमाणे गुरूवारीही चौकशी करण्यात आली.

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

मराठा संघटनांच्यावतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दरम्यान अ‍ॅड. सदावर्ते यांची सुखरुपपणे पोलीस ठार्‍यातून रवानगी करण्यात आली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या आवाजाचा नमूना आज रेकॉर्ड केला. त्यांच्यावर २०२० मध्ये दाखल असलेल्या गुन्हयाप्रकरणी जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button