पुणे : ‘भाजप किसान मोर्चा’ची साखर आयुक्तालयावर ५ मेपासून बेमुदत धरणे | पुढारी

पुणे : 'भाजप किसान मोर्चा'ची साखर आयुक्तालयावर ५ मेपासून बेमुदत धरणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील उसाचे लागवड क्षेत्र व चालू कारखाने यांची गाळप क्षमता विचारात घेता योग्य नियोजन न झाल्याने सुमारे ५० लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक राहिला आहे. अतिरिक्त उसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून (दि.५) पुणे येथील साखर आयुक्तालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.

महाराष्ट्रातील गाळपाविना शिल्लक असलेल्या उसाचे तातडीने नियोजन करावे, यासाठी भाजप किसान मोर्चा मागील एक महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे. परंतु एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा डाव रचण्यासाठी जाणीवपूर्वक अतिरिक्त उसाच्या समस्या आणखी तीव्र करण्याचा राज्य सरकार व साखर सम्राट प्रयत्न करत आहेत, असा आरोप काळे यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात जाणारा ऊस मे महिना आला, तरी तोडला गेलेला नाही. त्यामुळे वजनात कमालीची घट झाली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा, असे बजावले जात असून किसान मोर्चा हे सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

उसाला प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान द्या

राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याची हमी द्यावी, अतिरिक्त उसाचे नियोजन करताना वाहतुकीचा खर्च शेतकर्‍याच्या बिलातून कपात करू नये, अतिरिक्त खर्च राज्य शासनाने साखर कारखान्यांना द्यावा, गाळप झालेल्या जळीत उसाला व तोडणी कार्यक्रमापेक्षा उशिरा तोडलेल्या उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्यास शिल्लक उसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रूपये अनुदान देण्याची मागणी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button