राजस्थान : दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जोधपूरमध्ये १० पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू | पुढारी

राजस्थान : दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षानंतर जोधपूरमध्ये १० पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू

जोधपूर; पुढारी ऑनलाईन : राजस्थानमधील जोधपूरमध्ये आज ईद साजरी केली जात असतानाच दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जोधपूरमधील जलौरी गेट परिसरात झेंडे लावण्यावरून काल रात्रीही हाणामारी झाली होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

आज पाच ठिकाणी दगडफेक करण्यात आली. हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, परिसरात अजूनही तणाव कायम आहे. संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस आयुक्तालयाने जोधपूर आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जोधपूरमधील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जो 4 मे 2022 रोजी मध्यरात्री 12.00 पर्यंत राहील.

अफवा पसरवू नये म्हणून जोधपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून पोलिस संरक्षणात ईदची नमाज अदा करण्यात आली.
जोधपूरमध्येही तीन दिवसीय परशुराम जयंती उत्सव सुरू असून धार्मिक ध्वजावरून दोन समुदायांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जालोरी गेट परिसरातून हा वाद सुरू झाला.

परशुराम जयंतीला लावलेल्या भगव्या ध्वजाच्या जागी इस्लामिक ध्वज लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला, त्यामुळे दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आणि हाणामारी झाली.

सोमवारी मध्यरात्रीनंतर अल्पसंख्याक समाजातील काही लोक ईदनिमित्त जलौरी गेटजवळील चौकात धार्मिक झेंडे फडकवत असताना हा वाद सुरू झाला. चौकाचौकात स्थापित स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्याला लोकांनी झेंडे लावले. ज्याला हिंदू समाजातील लोकांनी विरोध केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. गेहलोत यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले की, “जोधपूरच्या जलौरी गेटजवळ दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागातून हिंसक संघर्षाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आधीच तणावाचे वातावरण आहे. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या किमान पाच राज्यांमध्येही गेल्या काही आठवड्यांत अशाच प्रकारचे संघर्ष पाहायला मिळाले आहेत. रामनवमी, हनुमान जयंती आणि रमजानच्या काळात हा हिंसाचार झाला.

हे ही वाचलं का ?

Back to top button