मग गणपती, दहीहंडी, दांडियाचं काय करायचं ? ब्राह्मण महासंघाचा ‘भोंगाधारी’ राज ठाकरेंना सवाल! | पुढारी

मग गणपती, दहीहंडी, दांडियाचं काय करायचं ? ब्राह्मण महासंघाचा 'भोंगाधारी' राज ठाकरेंना सवाल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय भोंगा करत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ४ मे पासून भोंग्यांवर कारवाई झाली नाही, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश हिंदूत्ववाद्यांना दिला आहे.

आता राज यांच्या भूमिकेला थेट ब्राह्मण महासंघाकडून विरोध झाला आहे. ब्राह्मण आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज ठाकरेंना हळूच चिमटा काढला आहे. मशिदीचा भोंगा काही कालावधीसाठी असतो, पण हिंदूंचे सण वर्षभर असतात, त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा असे आवाहन दवे यांनी केले आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवल्यास हिंदू सणांचे काय करायचे ? असा प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाने हिंदुत्वाचे नुकसान होणार आहे असे ते म्हणाले. रस्त्यावरील नमाजाला हिंदू महासभेचा आजही विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, की रस्त्यावर नमाज पठण चुकीचे आहे, पण गणपती, विविध उत्सव, मांडवांमधील आरत्या या रस्त्यावर होत असतात. मिरवणूक, दांडियाचे काय करणार ? स्पिकर खाली आले पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातील भोंग्यांचे काय करणार? भोंगे उतरवणे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही शक्य झालं नाही, भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचे होणार असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्रात मला कोठेही दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छाही नाही, परंतु मशिदींवरील भोंगे उतरविले गेलेच पाहिजेत. 3 मे रोजी ईद आहे. त्यानंतर मशिदींवरील भोंगे न उतरल्यास 4 मेपासून मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा ऐकवली जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि.1) येथे दिला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. सभेसाठी राज्यभरातून मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 3 मे रोजी ईद आहे. मुस्लिमांच्या सणात मला विष कालवायचे नाही. मात्र, 4 मेपासून आम्ही कोणाचे ऐकणार नाही. या तारखेनंतर मशिदींवरील भोंगे लागल्यास आम्ही मनगटातील ताकद दाखवून देऊ, असे ते म्हणाले. भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. मुस्लिमांनीदेखील ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.

उत्तर प्रदेशात भोंगे उतरविले जात असतील, तर महाराष्ट्रात तसे का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रस्त्यावर नमाज पढण्याच्या कृतीवर त्यांनी हल्ला चढविला. रस्त्यावर नमाज पढण्याचा अधिकार मुस्लिमांना कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख ते कधीच करीत नव्हते. परंतु मी यावर टीका केल्यानंतर ते शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत आणि पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचे छायाचित्र लावत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचलं का ?

Back to top button