

पुणे : पुढारी वृत्तसेवा
इंजिनिअरिंगच्या विविध विभागातील मास्टर्स डिग्री करणारे विद्यार्थी आता पीएमपीला येणार्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करणार आहेत. त्याकरिता पीएमपीने 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अॅन्ड अर्बन प्लॅनिंग'ची नुकतीच स्थापना केली आहे. पीएमपीने वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना एकत्र आणून 'व्हिजन डॉक्युमेंट्री' तयार केली आहे. त्यातील ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी पीएमपीने सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व आय.टी.डी.पी.सोबत सामंजस्य करार केला.
'बस डे'च्या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'ने आयोजित केलेल्या चर्चासत्राप्रसंगी पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार पीएमपीचा हा करार गुरुवारी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर येथे झाला. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, सिम्बायोसिसच्या असो. प्रोफेसर स्वाती विस्पुते व आय.टी.डी.पी.च्या प्रांजल कुलकर्णी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. यावेळी डॉ. केरुरे, एसटीपीआयचे संचालक संजय गुप्ता, सीओइपीच्या अर्चना ठोसर व अन्य उपस्थित होते.
डॉ. केरुरे म्हणाल्या, 'पीएमपीसाठी पुणे शहरातील नामांकित संस्था या सामंजस्य कराराच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत, ही एक आमच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.'
पीएमपीची स्थापना 2007 मध्ये झाली. आता पीएमपीला नवीन स्वरूप देण्याची गरज आहे. 'अपडेट' होणे ही एक प्रक्रिया असून 'अपडेट' होत असताना समस्या कुठे येतेय, समस्या आलीच तर त्यावर उपाय काय, हे या सामंजस्य कराराच्या माध्यमातून समजण्यास मदत होणार आहे.
– लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल