पुणे, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्याचा चाकूने वार करून खून केला. आणि चाकू घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. त्याने खून केल्याची माहिती देताच पोलिसांची देखील भंबेरी उडाली. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय.65, रा. आकाशदिप सोसायटी खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिसांनी अशोक गुलाब कुडले (वय.38,रा. खडकी बाजार) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी (दि.20) साडेसातच्या सुमारास खडकी बाजार बस थांब्याच्या एका कपड्याच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी कुडले व खून झालेली व्यक्ती उत्तरकर यांच्यात सासरे-जावयाचे नाते आहे. 2019 पासून कुडले व त्याच्या पत्नीचा कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून दोघे वेगळे राहत आहेत. कुडले हा त्याच्या आईसोबत राहतो. तर त्याची पत्नी तिच्या वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. उत्तरकर यांची दोन दुकाने असून ती त्यांनी भाड्याने दिली आहेत. तर जावई कुडले हा वडापावची गाडी चालवतो.
तसेच, कुडले हा पत्नीला नांदायला पाठवा असे सांगत होता. तर सासरे घटस्फोट घेण्याचे सांगत होते. त्यातून दोघांत वाद सुरू होते. बुधवारी (दि.20) कोर्टात सुनावनी होती. सुनावनी झाल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद सुरू झाले. उत्तरकर सायंकाळी साडे सातच्या सुमारास कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन धारधार चाकूने त्यांच्यावर वार केले. सहा ते सात वार झाल्याने उत्तरकर हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. त्यानंतर कुडले हा चाकू हातात घेऊन स्वतः खडकी पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्यावेळी उत्तरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.
हेही वाचा