pune crime : पुण्यात बँक अधिकाऱ्याने लॉकरमधील चोरले १ किलो सोने | पुढारी

pune crime : पुण्यात बँक अधिकाऱ्याने लॉकरमधील चोरले १ किलो सोने

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे (ता. जुन्नर) येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या ५१ लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११४ तोळे सोन चोरी (pune crime) गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. १) समोर आला होता. या प्रकरणाचा ७२ तासात छडा लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. त्यातील चोरी केलेले ११४ तोळे सोन्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके उपस्थित होते. सोसायटीचा वसुली अधिकारी विकास शांताराम खिल्लारी व सचिन अशोक सोणवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे (pune crime) यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लार्क विकास शांताराम खिल्लारी (रा. बेल्हे) यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर बंद करून सोसायटीच्या लॉकरमध्ये तारण ठेवलेले ५१ लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११४ तोळे सोने चोरून नेले होते. शाखा व्यवस्थापक विनोद दत्तात्रय महाडिक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शुक्रवारीच वसुली अधिकारी विकास खिलारी याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली.

दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपासाची चक्रे फिरवली. वसुली अधिकारी विकास खिलारी (pune crime) यास प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरलेल्या ११४ तोळे सोन्यापैकी ५१ सोने त्याचा मित्र सचिन अशोक सोनवणे याच्या घरी आणि उर्वरित ६३ तोळे सोने त्याच्या नावावर नारायणगाव येथील मनप्पुरम गोल्ड लोन येथे तारण ठेऊन त्यावर कर्ज घेतेले असल्याची कबुली दिली. सचिन सोनवणे यास ताब्यात घेत अटक केली.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पोलीस नाईक संजय शिंगाडे, पोलीस अमलदार अमित माळूंजे, मोहन आनंदगावकर यांनी हि कारवाई केली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहे.

Back to top button