पिंपरी : लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने ‘त्या’ आठ वर्षाच्या मुलाचा खून | पुढारी

पिंपरी : लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने 'त्या' आठ वर्षाच्या मुलाचा खून

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. गुंडा विरोधी पथकाने या खुनाचा छडा लावला. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत असताना विरोध केल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पथकाजवळ दिली आहे. लक्ष्मण देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवासी याच्या घराजवळ राहणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वी परिसर सोडून गेलेल्या आरोपीने देवासी याला पडक्‍या जागेत नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने त्यास विरोध केला. लक्ष्मण घरी जाऊन सांगेल व आपल्यावर गुन्हा दाखल होईल, या भितीतून त्या आरोपीने लक्ष्मण याचा दगडाने ठेचून खून केला, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

रविवारी दुपारी देवासी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली. रविवारी (दि.१७) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लक्ष्मण याचा खून झाल्याचे उघडकीस आले. लक्ष्मण याच्या खुनाची माहिती मिळताच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले व त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला.

सोमवारी देखील आंदोलन सुरूच ठेवले. जोपर्यंत आरोपीला शोधून अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात न घेता चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या माडंला. दरम्यान, चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. गुंडा विरोधी पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता एकाने ही कबुली दिली आहे.

Back to top button