डोंबिवली : रॅलीत सफाई कर्मचाऱ्यावर चाकूचे वार करणाऱ्यास अटक | पुढारी

डोंबिवली : रॅलीत सफाई कर्मचाऱ्यावर चाकूचे वार करणाऱ्यास अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर हॉस्पिटल परिसर येथून घरी जात असताना वंचित बहुजन आघाडीच्या एका युवा कार्यकर्त्यावर चाकूचा हल्ला झाल्याची घटना आंबेडकर जयंतीच्या रात्री घडली होती. दरम्यान आधीच्या वादातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून संशयिताला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्व येथे राहणारा रोहित भोसले (वय २०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कोपर क्रॉस रोड येथील तेलकास वाडी येथे राहणारा अक्षय दशरथ वाटोळे (वय २४) शास्त्रीनगर रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. होळीच्या दिवशी झालेली भांडणे सोडवण्यासाठी अक्षय मध्ये पडला होता. या घटनेचा राग मनात ठेवून आंबेडकर जयंतीच्या दिवशी रात्री निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अक्षयवर रोहित भोसले याने चाकूने वार केले.

सुदैवाने या घटनेत अक्षय वाचला असून सध्या तो शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहे. तर रोहित याला पोलिसांनी पकडताच त्याने छातीत दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे त्याला विष्णूनगर पोलिसांनी कळवा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वडणे करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button