संगणक अभियंता सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याचा अत्याचार, व्हिडिओ दाखवूनही सासूचा कानाडोळा | पुढारी

संगणक अभियंता सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याचा अत्याचार, व्हिडिओ दाखवूनही सासूचा कानाडोळा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : संगणक अभियंता असलेल्या सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सासर्‍यासह पीडितेच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

अमरावती येथील एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य त्यांच्या संगणक अभियंता असलेल्या २६ वर्षीय मुलाचा धुळे येथील तरुणीसोबत दि. २४ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर संबंधित पीडिता अमरावती येथे गेली. मात्र, काही महिन्यानंतरच तिचा सासऱ्याकडून छळ सुरू झाला.

सेवानिवृत्त सासऱ्याने सुनेवर संशय घेऊन मुलाला फारकत देण्यास भाग पाडण्याची धमकीदेखील दिली. तसेच सुनेकडून पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी करत सुनेच्या माहेरी सासरच्यांनी हजेरी लावली. तसेच तिच्या चारित्र्यावर आरोप करत विवाहितेवर अत्याचार केला. विवाहितेने सासरा अत्याचार करत असल्याचे चित्रीकरण भ्रमणध्वनीमध्ये कैद केले. ही चित्रफीत विवाहितेने सासू आणि पतीला दाखवल्यानंतरही त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही.

कोरोना कालावधीत निरंतर अत्याचार सहन केल्यानंतर कोरोनाचे निर्बंध हटविले गेल्यानंतर विवाहितेने तिच्या मामाला हा प्रकार सांगितला. यानंतर मामाच्या मदतीने वडिलांकडून विवाहितेने धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासऱ्यासह सासू आणि पती या तिघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button