यंदा देशात ९९ टक्के पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर | पुढारी

यंदा देशात ९९ टक्के पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला. यंदा मान्सून सामान्य राहील. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २०२२ मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदा संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी ९९ टक्के बसणार असून तो सामान्य राहील (९६ ते १०४ टक्के), अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा मान्सून कसा राहील याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण उन्हाळा अति तीव्रतेने जाणवत आहे. महापत्रा यांनी सांगितले की, यंदा देशात सर्वदूर ९९ टक्के पाऊस पडेल. मात्र पूर्वोत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे.

मान्सून कधी येईल?

मान्सून नेमका कधी येईल याबाबत महापत्रा यांनी सांगितले की, मान्सून केरळात नेमका कधी येईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही १५ मे रोजी ती तारीख जाहीर करणार आहोत.

ला नीना आणि आयओडी स्थिती चांगली

महापात्रा यांनी सांगितले की, यंदा व व भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) ची स्थिती सकारात्मक असून असल्याने देशात पाऊस चांगला होईल. मात्र ऑगस्टनंतर ला नीना तटस्थ होणार आहे. त्या पुढची स्थिती आम्ही दर महिन्याला सांगणार आहोत. यंदा देशात खूप जास्त तापमान आहे. त्याचा मान्सूनवर चांगला अथवा वाईट परिणाम होईल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना महापत्रा म्हणाले की, खूप जास्त तापमान किंवा कमी तापमानाचा मान्सूनची थेट संबंध नाही. १९७१ ते २०२० इतक्या वर्षातील पावसाच्या आकडेवारीवर यंदाचा अंदाज आम्ही दिला आहे.

भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अनेक भागात, देशाचा वायव्य भाग आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

संपूर्ण देशात मान्सून (जून ते सप्टेंबर) सामान्य म्हणजे दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) ९६ ते १०४ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० च्या डेटावर आधारित, भारतातील वार्षिक पर्जन्यमानात मान्सूनचा ७४.९ टक्के वाटा आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यातील मान्सून हंगामात अनुक्रमे १९.१ टक्के, ३२.३ टक्के, २९.४ टक्के आणि १९.३ टक्के पावसाचे योगदान आहे. १९६१-२०१० मधील डेटाच्या तुलनेत हे आकडे बदलत राहिले आहेत.

Back to top button