राज ठाकरे नकला करून सरड्यासारखे रंग बदलतात : अजित पवार | पुढारी

राज ठाकरे नकला करून सरड्यासारखे रंग बदलतात : अजित पवार

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राज ठाकरे यांना नकलांशिवाय दुसरे काहीही येत नाही. एकेकाळी आपले निवडून आलेले १४ आमदार आपल्याला सोडून का गेले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. राज ठाकरे पलटी मारण्यात माहीर असून, लोकसभेला त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काय केले ते आपण पाहिले. इतके सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या नेत्याची विश्वासार्हता नाही. त्यांना पुणे, नाशिकच्या जनतेने पाठिंबा दिला होता. त्यांच्यावर विश्वासार्हता नसल्याने सर्व त्यांना सोडून जातात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

गुढीपाडव्यानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटकांवर कडाडून टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती

राज ठाकरे यांच्या ‘१९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीयवादाचा जन्म झाला’ या टीकेवर अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांना अचानक काय झाले. शरद पवार यांची मुलाखत घेताना त्यांनी त्यांचे कौतुक केले. असा काय चमत्कार घडला की पवार त्यांना जातीयवादी वाटू लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत शरद पवार हे १९६२ पासून राजकारणात आहेत. त्यावेळी या लोकांचा जन्म देखील झाला नव्हता. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखे आहे, असे म्हणत राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

कुणी हवेवर बोलेल, त्यावर विश्वास ठेवू नका

काहीजण सभेमध्ये हलकाफुलका विनोद करून हसवण्याचे काम करीत असतात. मात्र, हे सर्वच भाषण विनोद व हसवण्याचे करतात. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्व मदरसे तपासा, असेही बोलल्याचे सांगितल्यानंतर अजित पवार म्हणाले की, त्यांनी पुढे येऊन तशी लेखी तक्रार पोलीस ठाण्यात करावी. पोलीस यंत्रणा याबाबत तपास करेल. नुसते कुणी हवेवर बोलेल, त्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगत स्वतः राज ठाकरे हेच सर्वात जास्त जातीयवादी आहेत. शरद पवार यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत. शरद पवार हे नेहमी शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे गेले आहेत. टीका करणाऱ्यांचा मागचा इतिहास पहिला, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button