पुणे : फुकट भाजी दिली नाही म्हणून मुलाला मारहाण, हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : फुकट भाजी दिली नाही म्हणून मुलाला मारहाण, हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार बालाजीनगर येथे घडला. बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी संबंधित अल्पवयीन मुलाला मारहाण करत पाया पडायला लावले.  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर सहकारनगर पोलीस खडबडून जागे झाले असून संबंधितांवर आता  गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका अल्पवयीन मुलाला मारहाण करून पाया पडायला लावल्याचे दिसून येत आहे. हत्यारांच्या जोरावर दहशत माजवून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा हा प्रकार भरदिवसा घडल्यानंतरही याप्रकरणात कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. याबाबत सामान्य नागरिकांना जे दिसते ते पोलिसांना का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.

दरम्यान, हातात हत्यारे घेऊन साेशल मीडियावर  दहशत पसरविणार्‍या तसेच भाजीचे पैसे मागितले, म्हणून पाया पडायला लावून मारहाण करणार्‍या त्या गुंडावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. साेशल मीडियावर व्‍हायरल  हाेणारे काही व्हिडीओ जुने असून यापूर्वीच त्या अनुषंगाने संबंधित संशयित आरेापींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांनी सांगितले.

शहरात एकीकडे मोक्का, एमपीडीए, तडीपारीने गुंडाच्या बेकायदेशीर हालचालीला लगाम घालण्यात पुणे पोलिसांना यश आल्याबाबत बोलले जाते. परंतु, काही घटनांमध्ये स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा गुंडांचे फावते ? त्यातून सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवर व गुन्हे करणाऱ्यांवर  वचक नाही का ? असे प्रश्न या निमित्त उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button