Imran khan : वादग्रस्ततेने घेरलेले इम्रान खान स्वतःच्या मुलीला नाकारतात तेव्हा…  | पुढारी

Imran khan : वादग्रस्ततेने घेरलेले इम्रान खान स्वतःच्या मुलीला नाकारतात तेव्हा... 

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकार्त्यांच्‍या जीवनात वादग्रस्तता निर्माण होणं, ही गोष्ट काही नवीन नाही. पंतप्रधानपद वाचविण्याची धडपड करणारे इम्रान खान (Imran khan) यांचं खासगी आयुष्यही वादग्रस्ततेने भरलेलं आहे. त्यांनी तीन लग्न केली आहेत. त्यांच्या प्रेम प्रकरणांच्या यादीत बाॅलिवूड अभिनेत्रींपासून सर्वात श्रीमंत महिलांचा समावेश आहे. अशीच एक महिला आहे सीता व्हाईट, जी इम्रान खान यांच्या आयुष्यात घडलेल्या सर्वात मोठ्या सॅंडलला कारणीभूत ठरली  हाेती.

१९८७-८८ सालची गोष्ट. त्यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून इम्रान खान ओळखले जात होते. आपल्या प्रेम प्रकरणांमुळे ते
प्रसारमाध्यमांमध्ये प्लेबाॅय म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरीकडे सीताचे इटलीचा फोटोग्राफर फ्रेन्सेस्को वेंचुरीसोबत लग्न ठरले होते. दोघांचे काही महिने प्रेम प्रकरण सुरू राहिले. नंतर यांच्या नात्यांमध्ये इम्रान खान आले आणि त्यांनी हे नाते संपवून टाकले.

इम्रान यांना मुलगी नव्हे, तर मुलगा हवा होता… 

इम्रान आणि सीता १९९१ साली शेवटचे भेटले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांची कधीच भेट घेतली नाही. सीताने केलेल्या दाव्यानुसार, इम्रान (Imran khan) यांना तिच्याकडून मुलगा हवा होता. पण, ज्यावेळी त्यांना समजले की, त्यांना मुलगी होत आहे. त्यानंतर ते नाराज झाले. इम्रान यांचं म्हणणं होतं की, मुलगी कधीच क्रिकेट खेळू शकत नाही. त्यामुळे त्यांनी सीतेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र सीताने इम्रान यांचं ऐकलं नाही.

राजकारणामुळे स्वतःच्या मुलीला नाकारलं… 

१५ जून १९९२ साली सीता व्हाईट आणि इम्रान खान यांना मुलगी झाली. सीताने तब्बल ३ वर्षे आपली मुलगी टायरियन हिचा बाप कोण, हे जगाला कळू दिलं नाही. दुसरीकडे इम्रान खान यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात या प्रकरणाचा उल्लेख केला नाही. मात्र, १९९५ साली क्रिकेटर ते राजनेता’ झालेल्या इम्रान खान यांच्या प्रकरणाचं सिक्रेट जगासमोर आलं.

याचं वेळी इम्रान ४२ वर्षांचे झाले होते, त्यांनी ब्रिटेनच्या प्रचंड श्रीमंत असणाऱ्या जेम्स गोल्डस्मिथच्या मुलीच्या म्हणजेच जेमिमा हिच्याशी पहिले लग्न केले होते. त्याचवेळी पाकिस्तानच्या राजकारणात स्वतःला आजमवत होते. शेवटी सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर इम्रान यांनी टायरियनला स्वतः मुलगी असल्याचं नाकारले.

अमेरिकेच्या कोर्टात इम्रान यांचा पराभव

सीता व्हाईटने ठरवंल की, इम्रानला टायरियनचा बाप असल्याचं सिद्धच करायचं. १९९७ सालापर्यंत हे प्रकरण कॅलिफोर्नियाच्या कोर्टात सुरू होते. न्यायालयाची कार्यवाही सुरू असताना हजर न राहिल्यामुळे कोर्टाने इम्रान यांना टायरियनचा बाप असल्याचे घोषीत केले. असं असलं तरी, टायरियनला इम्रान यांनी स्वतःची मुलगी असल्याचं सार्वजनिकरित्या स्वीकारलेलं नाही.

जेमिमा बनली टायरियनची दुसरी आई; इम्रानने स्वीकारलं तिला

२००४ मध्ये ४३ व्या वर्षी सीताचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी सीताने टायरियनला जेमिमाकडे सोपविले. तेव्हापासून जेमिमा टायरियनची दुसरी आई आहे. जेमिमादेखील तिला स्वतःची मुलगी मानते. जेमिमा आणि इम्रान यांना झालेली दोन मुले सुलेमान आणि कासिम यांच्याही टायरियनचे चांगले नाते आहे.

सीता गेल्यानंतर इम्रान (Imran khan) यांनी टायरियनला काही मर्यादेपर्यंत आपली मुलगी मानली होती. त्यावेळी इम्रान म्हणाले होते की, टायरियनला वाटत असेल तर ती माझ्या आणि जेमिमासोबत लंडनमध्ये राहू शकते. जेमिमा आता टायरियनची कायदेशीर पालक आहे.

२०१८ साली पाकिस्तानच्या निवडणुकीत पुन्हा हे प्रकरण तापलं

पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार, आर्टिकल ६२ नुसार एका पंतप्रधानाचं चारित्र्य चांगलं असायला हवं. २०१८ मध्ये पंतप्रधान बनण्यापूर्वी इम्रान खान यांनी नाॅमिनेशन भरलं होतं, त्यामध्ये टायरियनचा उल्लेख केलेला नव्हता. विरोध पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि हे प्रकरण इस्लामाबाद न्यायालयात गेलं. हे प्रकरण त्यावेळचे विरोधी पक्षातील उमदेवार अब्दुल वहाब बलोच यांनी कोर्टात नेले होते. नंतर त्यांनी स्वतःच इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षात प्रवेश केला आणि केस मागे घेतली. त्यानंतर २०२१ मध्ये कोर्टात इम्रान यांच्यावर केलेले सर्व आरोप रद्द करण्यात आले हाेते.

हेही वाचलंत का? 

Back to top button