जळगाव : चहा विक्रीच्या नावाखाली व्यावसायिकाला तीन लाखांचा गंडा | पुढारी

जळगाव : चहा विक्रीच्या नावाखाली व्यावसायिकाला तीन लाखांचा गंडा

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; चहा विक्रीचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली एकाची तब्बल ३ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय-४८) रा. शेरा चौक, मेहरूण, जळगाव हे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांना अनोळखी नंबरवरून तीन फोन आले.  पहिल्यानंबरवरून साबीर खान, दुसऱ्या नंबरवरून पप्पु खान आणि तिसऱ्या अनोळखी नंबरवरून तौसिफ खान असे नावे सांगितले.

यावेळी शेख अहमद हुसेन यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून आसाम येथील ‘पर्ल टी’चा व्यवसाय करण्यासाठी सांगितले. शेख अहमद हुसेन यांना ‘झायका टी’ चा ब्रॅन्ड बनविण्यासाठी तिघांनी फोन पे आणि दिल्या खाते क्रमांकाच्या माध्यमातून पैसे मागितले. तिघांच्या सांगण्यावरून शेख अहमद हुसेन यांनी २३ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान वेळोवळी एकुण ३ लाख रूपये ऑनलाईन व खात्यावर जमा केले. दरम्यान चहाचा कोणताही माल पोहचला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख अहमद हुसेन यांनी शुक्रवार १ एप्रिल रोजी सायंकाळी सायबर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button