पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले वन विभागाने जीवनदान | पुढारी

पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले वन विभागाने जीवनदान

पुणे /शिरूर, पुढारी वृत्‍तसेवा : पुणे जिल्‍हातील शिरूर येथे शुक्रवारी (दि. २५) भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या बांधकाम नसलेल्या विहिरीत पडला. हा बिबटया चार वर्षाचा असून शिरूर वनपरिक्षेत्र रेस्क्यू टीमने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्‍यानंतर त्‍याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, फाकटे येथील वाळुंजमळा या ठिकाणी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विठ्ठल मारुती वाळुंज यांच्या सामूहिक विहिरीत पडला. स्थानिक शेतकरी यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे समजताच घटनेची माहिती वन विभागाला दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच तात्‍काळ शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्यासह वनपाल चारुशीला काटे, वनरक्षक सविता चव्हाण, वनरक्षक ऋषिकेश लाड, वन कर्मचारी महेंद्र दाते, विठ्ठल भुजबळ आणि स्थानिक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

पाण्यात पडलेल्या बिबट्याला आधार मिळण्यासाठी विहिरीत लाकडाची फळी सोडण्यात आली. त्या फळीवर बिबट्याने आधार घेतला. रेस्क्यू टीमने विहिरीत पिंजरा सोडला. बिबट्याने स्वतःला वाचविण्यासाठी पिंजऱ्यात उडी मारली. यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन विभागाच्या रेस्क्यू टीम व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सायंकाळी विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे.

हेही वाचा 

Back to top button