धुळे : मालेगावातून सुरतकडे जाणारी २५ लाखांची रोकड जप्त | पुढारी

धुळे : मालेगावातून सुरतकडे जाणारी २५ लाखांची रोकड जप्त

धुळे, पुढारी वृत्तसेवा :  मालेगाव शहराकडून सुरतकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून पंचवीस लाखांची रोकड धुळे तालुका पोलिसांनी जप्त केली. ही रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच यासंदर्भात आयकर विभागाला पत्र व्यवहार करण्यात आल्‍याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, धुळे येथून कुसुंबा मार्गे एका ट्रकमध्ये २५ लाखांची रोकड सुरतकडे घेवून जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कुसुंबा येथील उड्डाणपुलाच्या खाली सापळा लावला. मालेगावकडून येणारी एम एच 17 ए जी 0592 या क्रमांकाचा ट्रक पुलाजवळ आला. त्‍यानंतर या ट्रकला अडवून पोलिस पथकाने चालक शफिक शेख अहमद यांच्याकडे चौकशी केली.

दरम्‍यान, पोलिस पथकाला शेख यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी ट्रकच्या केबिनची झडती घेतली असता त्यांना एक पैशाचा बंडल आढळून आला. याबद्दल चौकशी केली असता चालकाने यात पैसे असल्याची माहिती दिली. ही रोकड मालेगाव येथील विजयभाई बाबूभाई पटेल यांनी दिली असून ती सुरत येथे पोहोचवली जाणार होती. मात्र या संदर्भात सविस्तर माहिती चालकाला नसल्याने ही रक्कम हवालाची असल्याचा संशय आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून या रोकड संदर्भात आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. आता आयकर विभागाकडून याची चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा 

 

Back to top button