पुणे : लाखो भाविकांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला तुकाराम बीज सोहळा | पुढारी

पुणे : लाखो भाविकांनी 'याची देही, याची डोळा' अनुभवला तुकाराम बीज सोहळा

पुणे पुढारी वृत्तसेवा : कीर्तनाचे सूर तारसप्तकात पोहोचताच नांदुरकीच्या वृक्षाची सळसळ झाली. अन् हातातल्या फुलांची नांदुरकी वृक्षाच्या दिशेने वृष्टी झाली. सोबतीला स्वर होते तुकाराम… तुकाराम… लाखो भाविकांनी तुकाराम बीजेचा सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला.

संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा अर्थात वैकुंठ गमन सोहळ्याची आज भाविकांनी अनुभूती घेतली. पहाटेपासून इंद्रायणीचा तीर वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेला होता. कोणी स्नान करण्यात, कोणी कपाळी अष्टगंध, बुक्का लावण्यात, तर कुणीही आपला पोशाख नीट करण्यात गुंतले होते. मनात एकच आस होती तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पाहण्याची. त्याप्रमाणे सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येत होते.

पहाटे तीन वाजता काकडा झाला.  श्रींची महापूजा, शिळा मंदिरात पूजा, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आदींच्या हस्ते सर्व पूजा झाल्या.

चांदीच्या पादुका चकाकी देऊन आणल्या होत्या. फुलांनी सजवलेली पालखी भजनी मंडपात ठेवण्यात आली होती. या ठिकाणी पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. सकाळी दहा वाजता पालखी मानकऱ्यांनी खांद्यावर घेतली. एकच गलका झाला आणि पालखी वैकुंठस्थान मंदिराच्या दिशेने निघाली.

पोलिसांनी दोरखंडाचे कडे केले होते. संत तुकाराम भजनी मंडळ व पाठीमागे पालखी असा लवाजमा चालला होता. वाटेत थांबलेले लाखो जण दर्शनासाठी धडपडत होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास पालखीचे वैकुंठ स्थान मंदिरात आगमन झाले. प्रदक्षिणा करून पालखी मंदिराच्या दारात ठेवण्यात आली. मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेतल्या वैकुंठ अस्थान मंदिरात ठेवल्या. मंदिरात पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश, डॉ. प्रशांत जाधव, किशोर यादव, प्रांताधिकारी संजय असवले आदी उपस्थित होते.

कीर्तन मंडपात बापु महाराज देहूकर यांचे किर्तन रंगात आले होते. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्यांहाती । मुक्त आत्मस्तुती सांडविन ॥ हे कीर्तन रंगले होते. महिला पुरुषांनी फेर धरले होते. किर्तन चांग किर्तन चांग । होय अंग हरी रूप ॥ पालखी सोबतच्या लोकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. ते पारंपरिक खेळात रंगले होते. संत तुकाराम महाराजांची महाआरती झाली.

वाढ वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीहरी बोलावितो ॥ अभंगाच्या या ओवी ऐकताच सर्व वारकरी एकचित्ताने नांदुरकीच्या वृक्षा च्या दिशेने पाहू लागले. नांदुरकीच्या वृक्षाची पाने सळसळली आणि तुकाराम… तुकाराम… नामघोष करीत लाखो भाविकांनी हातातली फुले नांदुरकी वृक्षावर उधळली. अशा प्रकारे बीज सोहळा डोळ्यात साठवून वारकरी परतीच्या प्रवासाला लागले.

हेही वाचा

Back to top button