कराड : दहनासाठी आता अग्निकाष्ठ सरपण | पुढारी

कराड : दहनासाठी आता अग्निकाष्ठ सरपण

कराड पुढारी वृत्तसेवा : मानवी पार्थिवाच्या दहनासाठी दोन पूर्ण वाढ झालेले वृक्ष तोडावे लागतात. त्यामुळे वृक्षांवर अवलंबून असलेल्या प्राणी, पक्षी व एकुण पर्यावरणाला धोकाच निर्माण होत आहे. हा संभाव्य धोका ओळखून कराडमधील काही सजग लोकांनी कराड नगरपालिकेच्या सहकार्याने दहन परंपरेसाठी एका वेगळ्या माध्यमाचा विचार केला आहे.

मानवी जीवनाचा अंत झाल्यानंतर त्याच्या देहाच्या क्रियाकर्माबाबत वेगवेगळ्या धर्मांच्या परंपरेप्रमाणे विविध प्रथा आहेत. मृतदेहाच्या दहनाची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. दहनासाठी लाकडांची गरज असल्याने वृक्षतोड करावी लागते. या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी झाडांचा पडलेला पालापाचोळा, उसाच्या चोयट्या, बगॅस अशा बायोवेस्टमधून अग्निकाष्ठ नावाचे सरपण उपलब्ध केले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार आहेच. पर्यायाने वृक्षतोड थांबणार आहे. पर्यावरणाचा अधिक र्‍हास टळणार आहे.

प्रति किलो 10 रुपये दराने हे सरण उपलब्ध होणार असून एका मृत व्यक्तीस 150 ते 200 किलो सरण लागते. या सरणासाठी 1 लिटर रॉकेल किंवा डिझेल लागते. बाकी अन्य वस्तू उदा. खोबरे, तूप, कापूर वगैरे लागत नाही. एका दहनाचा खर्च जास्तीत जास्त दोन हजार रुपये होणार आहे.

हे सरण कराड नगरपालिकेच्या सहकार्याने स्मशानभूमीत उपलब्ध केले जाणार आहे. ही सुविधा पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कराडमध्ये होत आहे. अग्निकाष्ठ सरणामुळे होणार्‍या वृक्षतोडीस आळा बसून पर्यावरण रक्षणाचेच काम होणार असून वसुंधरा बचाव योजनेस चालना मिळेल. कराड नगरपालिका व पर्यायाने कराडकर नागरिकांचा यामुळे सन्मान होणार आहे. कराडमध्ये अग्निकाष्ठ सरण समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक पावसकर, महेंद्रकुमार शाह, सुरेश पटेल, सुधीर एकांडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Back to top button