पुणे : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला | पुढारी

पुणे : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यामध्ये ही महिला जखमी झाली. ही घटना ओतूर येथील आवळी रस्त्यावर आज (रविवार) सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या महिलेला मागच्या बाजूने बिबट्याने पंजा मारल्यामुळे महिलेच्या दंडावर व पाठीवर जखमा झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिराबाई दिलीप गाढवे (वय अंदाजे ५५) रा.ओतूर असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती ओतूर वन विभागास मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची टीम वनपाल एस. एम. गिते, वनरक्षक अतुल वाघोले, वन सहायक फुलचंद खंडागळे व साहेबराव पारधी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमी महिलेला शासकीय वाहनाने प्रथम ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

ओतूर आणि परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाताना शक्यतो दिवस उजाडल्यानंतर व समुहानेच जावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी ओतूर यांनी केले आहे.

Back to top button