मंत्री विश्‍वजित कदम : जिल्हा बँकेने चुकीची पावले टाकू नयेत | पुढारी

मंत्री विश्‍वजित कदम : जिल्हा बँकेने चुकीची पावले टाकू नयेत

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात सक्षम बँक म्हणून परिचित असली तरी सध्या एनपीए वाढला आहे. तो कमी करण्याच्या प्रयत्नात चुकीची पावले बँकेने टाकू नयेत, अशी सूचना सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी बँकेच्या विशेष सभेत केली.
सभेत ते ऑनलाईन सहभागी झाले होते. ते म्हणाले, बँकेचा दरवर्षीचा नफा चांगला आहे. शेतकरी, सभासदांनी त्यांच्या ठेवी मोठ्या विश्वासाने ठेवून बँक मोठी केली आहे. कर्जवाटप व योग्य व्यवस्थापन करुन बँकेच्या पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचार्‍यांनीही चांगले योगदान दिले आहे.

सध्या बँकेचा एनपीए वाढला आहे. तो कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड योजना, पुनर्गठन, राईट ऑफ यासारखे प्रस्ताव तयार केले आहेत. एनपीए कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा, मात्र तो करताना रिझर्व्ह बँकेचे नियम, सहकाराचे नियम पाळले गेले पाहिजेत. चुकीच्या गोष्टी त्यातून घडता कामा नयेत. ते पुढे म्हणाले, सवलती देताना प्रामाणिक कर्जदारांवरही अन्याय होता कामा नये. या सर्व गोष्टींचा अभ्यास बँकेने करावा. सध्या केंद्र शासनाची सहकाराकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. त्यामुळे सतत महाराष्ट्रातील सहकारावर त्यांचे लक्ष असते. आता रिझर्व्ह बँकेनेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. क्षणिक विचार न करता दीर्घकालीन विचार करून धोरणे राबवावीत.

Back to top button