बारामती : पारवडी बंधारा फोडणारे मोकाटच, बंधारा नेमका कोणाचा? घोळ कायम | पुढारी

बारामती : पारवडी बंधारा फोडणारे मोकाटच, बंधारा नेमका कोणाचा? घोळ कायम

बारामती : पुढारी वृत्तसेवा

पारवडी (ता. बारामती) येथे कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा काही लोकांनी ब्रेकर लावून फोडला आहे. यासंबंधी बुधवारी (दि. १६) ग्रामपंचायत, कृषी विभाग व पंचायत समिती विभागाकडे अधिक चौकशी केली. हे सर्व विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत असल्याने बंधारा फोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा सवाल निर्माण झाला आहे. तालुक्यातील महसूल विभागाला या प्रश्नाचे देणे-घेणे उरलेले नाही. त्यांच्याकडे अशा कामांसाठी वेळ उरला नसल्याची परिस्थिती आहे.

बंधाऱ्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने त्याचा पाणीसाठा आमच्या शेतात येतो. त्यामुळे गेली पाच ते सहा वर्षे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पाण्यामुळे जमीन नापिक होत असल्याचे लगतच्या शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हा बंधारा फोडल्याचे ही त्यांनी सांगितले.

पारवडीचे सरपंच खंडूजी गावडे म्हणाले, बंधाऱ्याच्या फुगवट्याचे पाणी शेतजमिनीत शिरत असल्याचे काही शेतकऱ्यांची तक्रार होती. यासंबंधी त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत त्यांच्या अर्जावर चर्चा झाली. त्यात उंची कमी करण्याचे ठरले.

बंधारा बांधताना शेतजमिनीचे होणारे नुकसान माती, मुरुम टाकून भरून देऊ, अशी चर्चा झाली होती. परंतु प्रत्यक्षात पुढे कार्यवाही झाली नाही. त्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने बंधाऱ्याची उंची कमी करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून द्यावे, अशी मागणी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे केली होती. लघु पाटबंधारे विभागाने येथे पाहणी केली असता लगतच्या शेतकऱ्यांचे पाण्यामुळे नुकसान होत असल्याचे दिसून आले होते. परंतु बंधारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी फोडला, या म्हणण्यात तथ्य नाही.

पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक कोकरे यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, या बंधाऱ्याची मृद व जलसंधारण विभागाने पाहणी केली होती. कृषी विभागाने आमच्या विभागाकडे बंधाऱ्याची उंची कमी करण्यासंबंधी अंदाजपत्रक करण्याची मागणी केली होती. परंतु कृषी विभागाच्या अखत्यारित ही बाब असल्याने आम्ही त्यास नकार दिला.

तक्रार आल्यास कारवाई

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण म्हणाले, हा बंधारा ज्या शासकीय विभागाच्या अखत्यारित आहे. त्यांनी तक्रार दिल्यास बंधारा फोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, यासंबंधी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील व गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

बंधारा फोडल्याचे निवेदन काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे. या बंधाऱ्याची जलसंधारण विभागाने पाहणी केली होती. त्यानंतर आमच्या विभागाला ग्रामपंचायतीने बंधाऱ्याची उंची कमी करण्यासंबंधी पत्र दिले. परंतु उंची कमी कऱण्याऐवजी बंधाऱ्याला गेट बसवून यातून मार्ग काढावा, असे पत्र कृषि विभागाने ग्रामपंचायतीला दिले. बंधारा फोडण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. बंधारा फोडल्याचे समजल्यावर मंडल कृषि अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल.

– सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी.

 

Back to top button