लवंगी मिरची : स्वप्न – एक पाहणे | पुढारी

लवंगी मिरची : स्वप्न - एक पाहणे

लवंगी मिरची 

(एका राजकीय पक्षाचे कार्यालय. दोन वयोवृद्ध कार्यकर्ते बोलत आहेत.)
पहिला कार्यकर्ता : बसून बसून कंटाळा आलाय; पण आपले जिल्हाध्यक्ष काही फिरकले नाहीत. आज मिटिंग होती ना, जिल्हा कार्यकारिणीची?

दुसरा कार्यकर्ता : होय हो, सकाळी 11 चे टायमिंग. आता तीन वाजायला आले. कुणाचा पत्ता आहे का बघा बरं!

संबंधित बातम्या

पहिला कार्यकर्ता : कार्यकारिणीचे चाळीस सदस्य; पण आपण दोघेच बसलोय ताटकळत.

दुसरा कार्यकर्ता : कुणाला फोन करायचा म्हटला, तर इथला फोन वर्षापूर्वीच कट झाला, मोबाईलवर बॅलन्स नाही.

पहिला कार्यकर्ता : आमची तीच रड. दुसर्‍या पक्ष कार्यकर्त्यांकडे दोन-दोन मोबाईल काय, गाड्या काय!

दुसरा कार्यकर्ता : राज्यात आपली सत्ता आहे म्हणतात; पण त्या दादा पक्षाचा बजेटचा वाटा साठ टक्क्यांपेक्षा अधिक. आमच्याकडे मुळात खाती दरिद्री. आमच्या वाट्याला धतुरा.

पहिला कार्यकर्ता : सत्तेचे कुंकू असून ही स्थिती. मग, इतर राज्यात काय असेल सांगा बरं!

दुसरा कार्यकर्ता : दिल्ली गेली, तेव्हापासून घसरणच आहे. हातात असलेले राज्यही कोणी नवखा पण हिसकावून घेतो आहे. एवढी आपली उज्ज्वल परंपरा पण लोक आता विचारत नाहीत.

पहिला कार्यकर्ता : कसे विचारतील लोक? सत्ता असताना झालेल्या भ्रष्टाचाराची फळे आहेत बरं. त्यातून ‘कमळ’वाल्यांचे नेतृत्व कसे खंबीर, करारी आणि द्रष्टे आहे. लोक उगाच नाही त्यांच्या भजनी लागत.

दुसरा कार्यकर्ता : खरे आहे. मान्यच केले पाहिजे. आपला पक्ष मात्र निर्नायकी झालाय. कसा धरणार उभारी?

पहिला कार्यकर्ता : तुम्ही-आम्ही आता साठी ओलांडली. जिल्हाध्यक्ष आपल्याचबरोबरचे. गेल्या दहा वर्षांत आपल्या युवा शाखेत नवा कोणी आला नाही. विद्यार्थी शाखेचे तेच. मूळ पक्षच बरखास्त व्हायची वेळ आलीय.
(दाराशी रिक्षा वाजते. दोघे कार्यकर्ते येतात. चेहरे आनंदाने फुललेले.)

तिसरा कार्यकर्ता : काय कसली चिंता करता? आता संपले काळजीचे दिवस.

पहिला कार्यकर्ता : काय सांगता काय? आपण काय ‘कमळा’च्या पक्षात जाणार काय? बरे होईल, दिवस तरी बदलतील.

चौथा कार्यकर्ता : अहो, दुसरीकडे जायची बात कशाला? आपलाच पक्ष येणार आता सत्तेवर!

पहिला/दुसरा कार्यकर्ता : (आश्चर्याने) काय सांगता? कोणा चमत्कारी बाबाने काही जादू, मंत्र केलाय की काय?

चौथा कार्यकर्ता : नाही, नाही! चमत्कार वगैरे काही नाही. अहो, आपल्या प्रदेशाध्यक्षांनीच जाहीर केलेय तसे.

पहिला कार्यकर्ता : काय केलेय जाहीर?

तिसरा कार्यकर्ता : अहो, प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेय की, 2024 मध्ये आपला पक्ष सत्तेवर येणार. आपला मुख्यमंत्री होणार. आनंदी आनंद गडे!

दुसरा कार्यकर्ता : तुम्ही कुठल्या बारमधून किंवा हुक्का पार्लरमधून आला नाहीत ना?

चौथा कार्यकर्ता : (रागाने) काय हे! खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याची थट्टा?

दुसरा कार्यकर्ता : थट्टा नाही हो. सध्याच्या परिस्थितीत स्वप्नात तरी अशी भाकणूक प्रत्यक्षात येईल का?

तिसरा/चौथा कार्यकर्ता : काही तरी बरळू नका. भाऊ म्हणतात ते खरेच होणार.

पहिला/दुसरा कार्यकर्ता : अशी शेखचिल्लीची स्वप्ने पाहून कुठे सत्ता येते का? तुम्हाला लागलंय वेड. चक्क वेडे झालात तुम्ही.
(एकदम गोंधळ उडतो. एकमेकांच्या अंगावर धावूून जातात. त्यातच पडदा पडतो.)

– झटका

Back to top button