नाशिकमध्ये पोलिस चौकीतच पोलिसांची मद्यपार्टी (Video) | पुढारी

नाशिकमध्ये पोलिस चौकीतच पोलिसांची मद्यपार्टी (Video)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेवनगर पोलिस चौकीतच पोलिस कर्मचाऱ्यांनी मद्यपार्टी केल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिक परिसरात मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी देण्यासाठी गेले असता हा संतापजनक प्रकार समोर आला. मद्यपी पोलिसांनी तक्रारदार बंधूंना पोलिस चौकीत मारहाण करून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मद्यपी कर्मचाऱ्याचा शोध घेतला.

दादोजी कोंडदेव नगर परिसरातील महापालिकेच्या बागेत प्रेमी युगुलांचे चाळे व मद्यपींचा रोजचाच त्रास असल्याची तक्रार बाळासाहेब शिंदे हे त्यांच्या भावासोबत रात्री पोलिस चौकीत गेले. त्यावेळी चौकीतच टेबलवर मद्याने भरलेले ग्लास व तेथे बसलेले पोलीस आढळून आले. शिंदे बंधूंना दोघा पोलिसांनी मारहाण केली. शिंदेंनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक चौकीसमोर जमा झाले. गर्दी झाल्याचे पाहून पोलिसांनी तेथून पळ काढला.

या घटनेनंतर रात्री उशीरार्यंत या भागात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

टवाळखोराची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलो तर दरवाजा आतून बंद होता. त्यांनतर पोलिसांनी दरवाजा उघडला मला पाहून त्यांनी चौकीतील लाईट बंद करून मारहाण केली. त्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाल्यानंतर पोलीस पळून गेले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. – बाळासाहेब शिंदे, तक्रारदार

चौघा पोलिसांची वैद्यकीय तपासणी केली आहे. तक्रारदारांचा तक्रार अर्ज घेतला असून त्यावरून चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्त यांना देण्यात येईल त्यांनतर पुढील कारवाई होईल.
रियाझ शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे

हेही वाचा :

पहा व्हिडिओ :

Back to top button